दयानंद लिपारे

टाळेबंदी शिथिल झाल्यावर वस्त्रोद्योगाचे दार काहीसे किलकिले झाले आहे. तरी त्यामध्ये उत्साहाचे वातावरण नाही. उन्हाळ्यातील लग्नसराई, रमजान ईद, शाळा गणवेश हे कापड विक्रीचे मुख्य हंगाम वाया गेले. त्यामुळे आता कापड उत्पादन करूनही त्याला भविष्यात फार मोठा ग्राहकवर्ग मिळेल अशी स्थिती नाही. शिवाय ग्राहकांची क्रयशक्ती घटल्याने आगामी काळात विक्रीला कितपत प्रतिसाद मिळणार याविषयी साशंकता आहे.

देशांमध्ये करोना संसर्ग वाढू लागल्यानंतर सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद करावे लागले. दोन महिन्यांनंतर काही नियम अटींवर उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने वस्त्रोद्योगाध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. कापूस, कापडनिर्मिती, कापड प्रक्रिया (प्रोसेस), तयार कपडे बनवणे (गारमेंट) अशी साखळी हळूहळू कार्यरत होत आहे. ती पूर्णपणे सुरू होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे केवळ कापडाची निर्मिती होऊन त्याचा फारसा उपयोग नाही. यंत्रमागावर निर्मित कापडावर कापड प्रक्रिया (प्रोसेस) होण्यापासून ते तयार कपडे बनवणे ही प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष दुकानांमध्ये उपलब्ध होणे येथपर्यंत साखळी सक्रिय झाल्याशिवाय उद्योग व अर्थचक्राला गती येणार नाही. मुख्य म्हणजे कापडनिर्मिती, तयार कपडेनिर्मिती झाली तरी त्याला ग्राहक कसा मिळणार याविषयी वस्त्रोद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गती मंदावली

उन्हाळ्यामध्ये लग्नसराई भरात आलेली असते. नेमक्या याच काळात टाळेबंदी सुरू झाल्यामुळे लग्नाचा झगमगाट दूर होऊन घरीच शुभमंगल आवरून घेतले जात आहे. करोना महामारी वाढू लागल्याने मुस्लीम बांधवांनी सण उत्साहात साजरा करण्याचे टाळल्यामुळे नवे कपडे खरेदी न होताच सण साधेपणाने साजरा केल्याने या हंगामातील कपडय़ांची विक्री जवळपास ठप्प झाली. जूनच्या मध्यास शाळा सुरू होतेवेळी देशभरातील कोटय़वधी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश खरेदी केले जातात.

काही शाळांमध्ये तर आठवडय़ाला तीन-चार गणवेश वापरणे बंधनकारक आहे. यंदा गणवेशनिर्मितीचे काम मंदगतीने झाले आहे.  उन्हाळाच्या उत्तरार्धात दसरा व दिवाळीच्या कपडय़ांची तयारी होत असते. कापडनिर्मिती, प्रोसेस, तयार कपडे अशी प्रक्रिया ही ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊन गणपतीदरम्यान प्रत्येक शहर, गावांमध्ये कापड, तयार कपडे पाठवले जातात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये नवरात्र उत्सवात कापडाला मोठी मागणी असते. पाठोपाठ अवघ्या देशभर दिवाळीसाठी कपडे खरेदी केले जातात. टाळेबंदी सुरू असल्याने वस्त्रोद्योगात सूतनिर्मिती ते तयार कपडे अशी संपूर्ण साखळी पूर्णक्षमतेने कार्यरत नाही. परिणामी दसरा- दिवाळीसाठी कापडनिर्मितीची गती मंदावली आहे.

‘वस्त्रोद्योगासाठी प्रामुख्याने सण-समारंभ, विवाह समारंभ हीच मोठी बाजारपेठ असते. याकरिता जानेवारी ते मे अखेपर्यंत अविश्रांत काम होत असते. टाळेबंदीमुळे या कामाला खूपच मर्यादा आलेल्या आहेत. देशातील सण-समारंभातील ग्राहकांची संख्या आणि कापडनिर्मितीच्या उत्पादनाची गती पाहता मागणी-पुरवठा हे समीकरण जमण्यासारखे नाही. खेरीज, टाळेबंदीमुळे रोजगार गमवावा लागल्याने, अनेकांचे उत्पन्नही कमी झाल्यामुळे दसरा-दिवाळीमध्येही खरेदी मोठय़ा उत्साहात होण्यासारखे चित्र नाही. मुख्य हंगामावर पाणी सोडावे लागल्याने आता केवळ व्यवसाय उपचार म्हणून चालवला जात आहे,

– प्रकाश गौड, उद्योजक