मंडलिक यांची महाडिकांवर दोन लाखाने मात

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात महायुतीकडून लढणाऱ्या शिवसेनेला आत्तापर्यंत यशाने हुलकावणी दिली होती. पण यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार महाआघाडीच्या विद्यमान खासदारांना पराभूत करून ‘दिल्ली’वारी करण्यात यशस्वी ठरले आहेत.

कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे गतवेळचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सुमारे पावणे तीन लाखांच्या मताधिक्याने पराभव करून मागील पराभवाचे उट्टे काढले. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी १ लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात तुल्यबळ सामना रंगला होता. यामध्ये महाडिक यांनी ३३ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. या वेळी याच दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली, त्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्’ाचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनविला होता.

पहिल्याच फेरीत मंडलिक यांनी १५ हजारांचे मताधिक्य घेतले. त्यांना ३१९३१ मते तर महाडीक यांना १७१९७ इतकी मते पडली होती. सलामीच्या फेरीतच मताधिक्य मिळाल्याने शिवसेनेत उत्साह संचारला होता. तर राष्ट्रवादीत चिंता निर्माण झाली होती. मंडलिक यांनी त्यानंतर प्रत्येक फेरीत मोठय़ा प्रमाणात मताधिक्य घेणे सुरूच ठेवले. पहिल्या तीन तासात त्यांनी लाखाचा टप्पा ओलांडला.

या वेळी मंडलिक यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांसह महाघाडीच्या कार्यकर्त्यांंची मोठी गर्दी झाली होती. या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरीनेच संजय मंडलिक यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.

मंडलिकांचा महाडिकांवर प्रहार

निकालानंतर प्रतिक्रिया देताना संजय मंडलिक यांनी मतदारांनी कोल्हापुरात शिवसेनेला निवडून देऊ न सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले असे नमूद केले. धनंजय महाडिक यांचा नामोल्लेख न करता मंडलिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मतदारांनी ताठय़ात वावरणाऱ्यांची गुर्मी उतरवली, असा टोला त्यांनी लगावला.

‘आमचं ठरलयं’ उत्साहाला उधाण

पहिल्या फेरीतच प्रा. मंडलिकांनी आघाडी घेतल्याचे कळताच विजयी वातावरणाची निर्मिती होऊ लागली. मंडलिक यांनी दीड लाखाचे मताधिक्य घेतल्याचे कळताच आतषबाजीला सुरुवात झाली. ’आमचं ठरलयं’ या उत्साहाला उधाण आले. सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयासमोर तसेच कसबा बावडा भाग गुलालाने रंगून गेला होता. दिवसभर विजयाचा जल्लोष सुरुच होता. दुचाकी रॅली काढून कार्यकर्त्यांनी संजय मंडलिक यांच्या विजयाची मिरवणूक काढली, तेव्हा विजयी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.