कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील आंबा येथील बाजारात दाखल झाला आहे. गुरुवारी पहिल्या सौद्याला ४ डझनाच्या पेटीला ३० हजार रुपये दर मिळाला. तर प्रति डझन ५ ते ७ हजार रुपये दराने या पहिल्याआंब्याची विक्री झाली.
यंदाच्या आंबा हंगामावर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. तथापि दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात आंब्याची आवक सुरू झाली आहे. मालवण येथील सचिन गोवेकर व देवगड येथील वासुदेव चव्हाण यांची हापूस आंब्याची आवक झाली. बाजार समितीतील इब्राहिम बागवान व इक्बाल बागवान यांच्या दुकानात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ व बाजार समितीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते आंबा सौदे झाले. त्यामध्ये चार डझनाच्या पेटीला २५ ते ३० हजार रुपये दर मिळाला. जयवंत वळंजू यांनी एक डझन हापूस ७०० रुपये प्रती नग या दराने तर हाशिम बागवान यांनी १५ आंबे ५०० रुपये प्रती नग या दराने विकत घेतले, असे बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2021 1:19 am