14 December 2017

News Flash

कोल्हापुरात यंदाही ‘माणुसकीची भिंत’

हा उपक्रम या वर्षी १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी दसरा चौकात राबविण्यात येणार

दयानंद लिपारे, कोल्हापूर | Updated: October 11, 2017 3:31 AM

गतवर्षी गरिबांचा गुढी पाडव्याचा सण उजवळणाऱ्या ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. करवीरकरांच्या दातृत्वाची ओळख सर्वदूर पोहोचविणारा हा उपक्रम या वर्षी १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी दसरा चौकात राबविण्यात येणार आहे.

‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’ असे ब्रीद घेऊन सुरुवात झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम गेल्या दिवाळीपासून कोल्हापुरातील सीपीआर चौकात सुरू झाला आहे. या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उस्फूर्तपणे मदतीचा हात दिला. त्यामुळे वापरता येतील असे दोन लाखांहून अधिक

कपडे गरजू लोकांपर्यंत पोहोचवता आले. या उपक्रमाचे अनुकरण करीत पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी ‘माणुसकीच्या भिंती’ उभ्या राहिल्या. या वर्षी १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत दसरा चौकात पुन्हा ‘माणुसकीची भिंत’ उभी राहणार आहे. या ठिकाणी कोल्हापूरकरांनी वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे माणुसकीच्या भिंतीवर देऊन गरिबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन या उपक्रमाच्या संयोजकांनी केले आहे. या उपक्रमाच्या संयोजनासाठी सुधर्म वाझे, प्रसाद पाटील, अमर पाटील, सुरज पाटील, गणी आजरेकर, सचिन पाटील, निनाद कामत, देवेंद्र रासकर, प्रशांत पोकळे, इम्तियाज मोमीन आदी परिश्रम घेत आहेत.

समाज माध्यमचा उपक्रम

समाज माध्यमावरील ‘व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप’ म्हणजे नसत्या चकाटय़ा पिटणारे गट अशी सर्वत्र ओळख आहे. पण समाजाला माणुसकीची शिकवण देणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात एका ‘व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप’ वरून झाली. आमदार सतेज पाटील यांनी पाठबळ दिले. गेल्या वर्षी तीन दिवसांच्या उपक्रमात २५६९ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घरातील जुनी, मात्र वापरण्यायोग्य १ लाख ७९ हजार ८३० कपडे या उपक्रमासाठी दान केले. यातून दीड लाखांहून अधिक गरजू, गरिबांनी येथून कपडे घेऊन दिवाळी आनंदाने साजरी केली.

First Published on October 11, 2017 3:25 am

Web Title: manuskichi bhint campaign in kolhapur