दयानंद लिपारे

कोल्हापूर जिल्ह्य़ात गतवर्षी महापूर आपत्तीकाळात धावपळ करणारे बरेचसे नेते, लोकप्रतिनिधी आता करोना संकटातही सक्रिय आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. यावेळी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये महापूर आल्याने अतोनात आर्थिक हानी झाली होती. पुढे काही दिवसांवर विधानसभा निवडणूक असल्याने तीवर डोळा ठेवत लोकप्रतिनिधी, आमदारकीची स्वप्ने पाहणारे स्थानिक नेते यांनी पूरग्रस्तांना अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, औषधे आदी वस्तू मिळवून देण्याबरोबरच शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते.

करोना संसर्गाच्या वेळी सारेच मदतीसाठी पुढे आलेले नाहीत. विद्यमान लोकप्रतिनिधी करोना संसर्गावेळी लोकांच्या मदतीसाठी हात पुढे करताना दिसतात.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक वर्षअखेरीस होणार आहे. गेल्यावर्षी महापुरात निवडणूक इच्छुकांनी मदतीसाठी धावपळ सुरू होती; तसे चित्र आता कोल्हापूर शहरात पाहायला मिळत आहे. विविध प्रभागांमध्ये निवडणूक लढवणारे करोनाच्या निमित्ताने मुखपट्टी, निर्जंतुकीकरण यासह जीवनावश्यक वस्तू लोकांना पुरवून मतपेढी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एकंदरीत लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळी यांची मदत ही वरकरणी सामाजिक बांधिलकी दर्शवणारे असली तरी त्याला प्रामुख्याने राजकीय स्वार्थाची किनार असते हेच या दोन संकट काळात त्यांच्या मदतीच्या दृष्टिकोनातून स्पष्ट होताना दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे करोनाग्रस्तांना विविध मार्गाने मदत करताना दिसत आहे. अर्थात, त्यांचे प्रतिस्पर्धी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही मदत करण्याचा धडाका उडवून दिलेला आहे आणि दुसरीकडे खासदार खासदार संजय मंडलिक यांनीही आपल्या या तालुक्यात मदतीची मोहीम उघडली आहे. त्यामुळे कागल तालुक्याला चांगल्या प्रकारे दिलासा मिळताना दिसतो.

आमदारांचे सोयीचे गणित 

विद्यमान आमदारांना पैकी काँग्रेसचे चारही आमदार मदतकार्यात कमी-अधिक प्रमाणात पुढे आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव यांची मदतकार्यात पुढाकार आहे. तुलनेने राजू आवळे यांची मदत ठळकपणे दिसत नाही. तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची मदत मात्र नजरेत भरण्यासारखी आहे. माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांची पाहुण्यासारखी असणारी उपस्थिती टीकेचे कारण बनली आहे. इचलकरंजी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सुरुवातीच्या काळात मदतकार्यात घेतलेली आघाडी आता थोडी कमी पडली आहे. येथे आमदार प्रकाश आवाडे यांनी मदतकार्यात सातत्य ठेवून लोकसंपर्क जपण्याचे काम केले आहे.

शिरोळचे उल्हास पाटील महापुरात धावपळ करीत होते, आता ते विसावा घेत असताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मंत्रीपदाचा लाभ उठवत सरकारी मदत जनतेला मिळवून देत आहेत. महापुराच्या विस्तीर्ण जलाशयात उडी घेऊन प्रसिद्ध झालेले करवीरचे शिवसेनेचे चंद्रदीप नरके आता मात्र कोठेच दिसत नाही. तुलनेने आमदार पी. एन. पाटील यांची मदत लक्षणीय ठरलेली आहे. शाहुवाडी- पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी मदतकार्यात पुढाकार घेतला असताना माजी आमदार सत्यजित पाटील हे या काळात कुठे फिरताना दिसत नाहीत. शिवसेनेचे राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे साधनसामुग्री मर्यादित असली तरी लोकसंपर्क राखून आहेत.

संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोघा शिवसेनेच्या खासदारांनी करोना संसर्ग काळामध्ये लोकांशी संपर्क चांगला ठेवला आहे. विविध स्तरांतील जनतेचे प्रश्न समजावून घेऊन त्याचे निराकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.