कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्र व राज्य शासनाप्रति आक्रमक भूमिका घेतली आहे. तथापि त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी होईल, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी नाशिक येथे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, संभाजी राजे यांचा रुद्रावतार पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. त्यांची भूमिका योग्य आहे. पंतप्रधान मोदी यांनी चार वेळा पत्र पाठवूनही त्यांनी मराठा आरक्षण बैठक घेतली नाही. आघाडी सरकारवर ही त्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य शासन त्यांची नाराजी समजू शकते. त्यांच्या भूमिकेसोबत आघाडी सरकार राहील. त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न मार्गी लागेल.

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली होती. त्यांचे ऐकून केंद्र शासनाने दरवाढ मागे घेण्याच्या  निर्णयाचे स्वागत करतो, असा उल्लेख करून मुश्रीफ म्हणाले, पोटॅश, युरिया, संयुक्त खते यांसह अन्य काही खतांच्या दरवाढीबाबत अद्याप स्पष्टता नाही.  याबाबतही केंद्र शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्या रुग्णालयांवर कारवाई

काही खासगी रुग्णालय करोना रुग्णांवर सुविहित पद्धतीने (प्रोटोकॉल) उपचार करीत नसल्याने मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ पैसे मिळवण्याचा उद्देश ठेवून उपचारात हयगय करणाऱ्या खासगी रुग्णालयातील मृत्यूचे लेखापरीक्षण कृतिदला करवी  केले जाणार आहे. दोषी ठरणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.