मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे. मुंबई, पुणे शहराला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा समाजाच्यावतीने देण्यात आला होता. त्यानुसार आज गोकुळ दूध संघाच्या शिरगाव येथील मुख्य प्रकल्पस्थळी मराठा समाजाने ठिय्या आंदोलन केले.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत समाजाची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडल्याची भावना मराठा समाजात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी येथे आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला होता. तर आज मुंबई, पुणे शहराला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यातून महानगरांना दहा लाख लिटरहून अधिक दुधाचा पुरवठा होतो.

गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयासमोर आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून निदर्शने केली. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे दुधाची वाहतूक करणारी वाहने अडकून पडली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट

मराठा आंदोलकांना विरोध करताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रभर याचा उद्रेक होईल, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाने दिला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांच्या इशाऱ्याला न जुमानता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.