पुणे ते मुंबई ‘लाँग मार्च’ काढणार – संभाजीराजे

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी १६ जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर पुढे पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, समाजाला राजकीय पक्षांच्या वाद विवादात कसलेही स्वारस्य राहिले नाही. आरक्षणाची जबाबदारी केंद्र किंवा राज्याची आहे असे म्हणत लोकांना भ्रमित केले जात आहे. पण ही जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार दोघांची आहे. त्यामुळे आम्ही आंदोलनाची दिशा ठरवली आहे. कोल्हापुरात सुरुवात झाल्यानंतर पुढे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे ५ जिल्ह्यात मूक आंदोलन होईल. त्यासाठी त्या जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि  पालकमंत्री यांना आमंत्रित करण्यात येईल. तेथे लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात स्वत:ची जबाबदारी निश्चिात करावी.

ही वादळापूर्वीची शांतता आहे. कुणीही समाजाला गृहीत धरू नये. आम्ही जिल्ह्याजिल्ह्यात केवळ बैठका, चर्चाच करतोय असे नाही. त्याच दिवशी पुढील पुणे ते मुंबई या ‘लाँग मार्च’ची तयारी करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात तयारीच्या बैठका घेणार आहोत. लाँग मार्च हा सरकारला परवडणारा नसेल, असा इशारा त्यांनी दिला. तत्पूर्वी येत्या १२ तारखेला मी कोपर्डी येथे भेट देणार आहे. पुणे येथून सर्व समन्वयक, माझ्यासोबत तिकडे येणार आहेत. तिथून पुढे काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळास भेट देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.