मराठा आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न रविवारी सायंकाळी शाहूवाडी तालुक्यात घडला. आंदोलक मंत्र्यांपर्यंत पोहचू नयेत यासाठी प्रशासन आणि पोलीस डोळ्यात तेल घालून नियोजन करत असतानाही आंदोलकांनी गनिमी कावा करत हा प्रकार केला. त्यांनी ‘सदाभाऊ चले जाव’ अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले. खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेचे आमदार डॉ सुजित मिणचेकर यांच्या पाठोपाठ मराठा आंदोलकांनी आता मंत्री खोत यांना लक्ष्य केले आहे.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज शाहूवाडी तालुक्यात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा आयोजित केला होता. मराठा समाजाचे बांबवडे येथे ठिय्या आंदोलन सुरु आहे. मंत्री खोत हे आल्तूर येथील कार्यक्रम आवरून बांबवडेमार्गे पिशवी येथे कार्यक्रमासाठी जाणार होते, तेव्हा ते बांबवडे येथील आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी मार्ग बदलला आणि करंजफेण मार्गे पिशवी येथे दाखल झाले.

ही बाब आंदोलकांना आवडली नसावी. पिशवी येथे कार्यक्रम सूर असताना मराठा समाजाचे आंदोलक आरक्षण मागणीच्या घोषणा देत तेथे आले. त्यांनी काळे झेंडे दाखवून ‘सदाभाऊ चले जाव’ अशा घोषणा दिल्या. त्यांनी बांगड्याचा आहेर देत त्या मंत्र्यांच्या दिशेने फेकल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतरही खोत यांनी बैठक व्यवस्थित पार पडली, पण नंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावे लागले.