ज्येष्ठ साम्यवादी नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाला अडीच वर्षे झाली तरी तपास यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत . या खून प्रकरणातील संशयित पुण्याचा सारंग अकोलकर आणि कराड तालुक्यातील विनय पवार या सनातनी साधकांना अटक करण्यात अपयश आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधून देणारयांना प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की ओढवली आहे. मुळातच पोलिसांचा तपास  हा तपास  निश्चित दिशेने जात असल्याचे स्पष्ट करणारा नाही. आतापर्यंत अटक केलेले दोघेजण आणि आता बक्षीस जाहीर केलेले दोघेजण यांनी खून प्रकरणात नेमकी कोणती भूमिका बजावली हेच ठामपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. यामुळे तपासयंत्रणेवर ना पानसरे समर्थक समाधानी आहेत ना बचाव पक्ष.

पानसरे उभयतांवर कोल्हापुरात अडीच वर्षांपूर्वी गोळीबार झाला. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणेच आणखी एका पुरोगामी विचाराच्या नेतृत्वाचा आवाज कायमचा बंद केला गेला. राज्य शासनाने एसआयटी कडे तपासाची सूत्रे सोपवली. तपासयंत्रणेने वारंवार तपास योग्य दिशेने चालला असून सर्व आरोपींना जेरबंद केले जाईल, अशा घोषणा वारंवार केला, पण त्या अर्धवटच राहिल्या. ज्या पहिल्या आरोपीला अटक केली तो जामिनावर सुटला आहे.

या प्रकरणी सर्वप्रथम संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड  याला खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे, आदी गंभीर कलमे नोंदवून अटक केली. नंतर डॉ. वीरेंद्र सिंह तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला तर  २००९ पासून भूमिगत विनय पवार याला एसआयटीने तिसरा संशयित आरोपी असल्याचे  न्यायालयात सांगितले आणि शेवटी सारंग अकोलकर याचे नाव पुढे आले आहे. पवार व अकोलकर यांच्या अटकेसाठी पथके रवाना झाली, मात्र पोलिसांनी हे दोन्ही संशयित सापडले नाहीत. त्यांच्या अटकेसाठी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी न्यायालयात झाली . अखेर या दोघांचा जंग जंग पछाडूनही शोध न लागल्याने त्यांना शोधून देणार्यासाठी बक्षीस जाहीर करण्याची वेळ आली आहे.

पानसरे यांच्या हत्येचा कट डॉ. वीरेंद्र तावडे याच्या मालकीच्या ट्रॅक्स मध्ये शिजल्याचा संशय तपास यंत्रणांना होता.  ही ट्रॅक्स पोलिसांनी वाशीम येथून जप्त करण्यात आली. विनय पवार याने पानसरे यांच्यावर गोळी झाडल्याची माहिती  एसआयटीच्या चौकशीत समोर आली आहे. तावडे याची पत्नी निधी तावडे हिने एसआयटीला दिलेल्या जबाबात ही माहिती मिळाली. हल्ल्याच्या वेळी सारंग अकोलकर हा दुचाकी चालवत होता, असे या जबाबात म्हटले आहे. या माहितीवर लक्ष केंद्रित करून तपासाला दिशा दिल्याचे दिसत आहे.

असा शिजला हत्येचा कट?

पानसरे यांच्या हत्येचा कट २००९ पासून शिजत असल्याचे एसआयटीच्या तपासात पुढे आले होते. ऑगस्ट-सप्टेंबर २००९ साली मडगाव स्फोटातील आरोपी रुद्र पाटील, प्रवीण लिमकर, सारंग अकोळकर, जयप्रकाश हेगडे, मलगोंडा पाटील (मृत), धनंजय अष्टेकर, विनय पवार यांच्यासह वीरेंद्र तावडेने जत येथे जाऊन बॉम्बचे सíकट व बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या वेळी वापरण्यात आलेली ट्रॅक्सही तावडेची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले होते. याच ट्रॅक्समध्ये पनवेल ते जत या मार्गावर पानसरे यांच्या हत्येचा कट शिजल्याचा पोलिसांना संशय आहे.

अथक प्रयत्नातून साध्य काय ?

तपासयंत्रणेला गुन्ह्याचा शोध घेताना उसंत मिळाली नाही. दोन कोटी कॉल  रेकॉर्ड तपासले, संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली, सनातनच्या आश्रमावर छापे टाकले, बॅलेस्टिक रिपोर्ट मिळण्यासाठी तो थेट स्कॉटलॅण्ड यार्डकडे तपासणीसाठी पाठवला, सीआयडी, सीबीआय, एसआयटी, स्थानिक पोलीस असा चौफेर तपास सुरू ठेवला, शेकडो जणांकडे कसून चौकशी केली, असे अनेक मार्ग आजवर हाताळण्यात आले पण इतके सारे करूनही नेमके साध्य काय यावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

पवार, अकोलकर यांना शोधण्यात आमचे प्रयत्न थकले  आता बक्षिसासाठी लोकांनीच पुढाकार घ्यावा, असा जणू संदेश देत एका परीने तपासाच्या मर्यादा सीमित केल्याची तक्रार आहे. बक्षीस जाहीर केल्यावर भाकपचे शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पवार – अकोलकर यांच्या शोधासाठी  ‘स्पेशल टास्क फोर्स’ची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. जामिनावर सुटलेला समीर गायकवाड याला पोलिसांच्या तपासातील उणिवांचा फायदा मिळाला आहे, असे म्हणत भाकपचे स्थानिक नेते नामदेवराव गावडे यांनी नाराजी व्यक्त केली.

तपास निर्णायक टप्प्यावर

पानसरे खून प्रकरणाचा तपास नियोजनबद्ध सुरू आहे. तो निर्णायक टप्प्यावर आला आहे, असे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. जामिनावर सुटलेल्या समीर गायकवाडच्या जमीन अर्जाला शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याची पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे. त्यासाठी विधिज्ञांच्या सल्ल्याने प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये उणीव राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे तपास अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.