23 November 2017

News Flash

कोल्हापूरच्या अंबाबाईसमोर ‘गोंधळ’

घागरा-चोळी नेसवण्यावरून पुजारी हटाव मोहिमेला वेग

दयानंद लिपारे, कोल्हापूर | Updated: June 22, 2017 1:35 AM

महालक्ष्मी देवीची मूर्तीची झीज होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संवर्धन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी तो वादास कारणीभूत ठरला आहे.

घागरा-चोळी नेसवण्यावरून पुजारी हटाव मोहिमेला वेगश्रीपूजकांनी मात्र सर्व आरोप फेटाळले

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दारात गोंधळ घातला जातो. मात्र त्याहून अधिक ‘गोंधळ’ सध्या सुरू आहे तो वेगवेगळ्या कारणांवरून. कधी मूर्ती संवर्धनाचा विषय उचल खातो तर कधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील भ्रष्टाचारावरून वाद झडतो. देवीला घागरा-चोळी नेसवण्यावरून नव्या वादाची भर पडली असून त्याला आता मंदिरातील पुजारी (श्रीपूजक) हटाव मोहिमेची जोड मिळाली आहे.

साडेतीन शक्तिपीठांपकी एक असलेले करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रापकी एक आहे. त्याला सुस्वरूप यावे यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने मंदिर व परिसर विकासाचा २५५ कोटींचा  आराखडा शासनास सादर केला आहे. नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील ७२ कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखडय़ाला जिल्हा पर्यटन समितीच्या बठकीत मंजुरी देण्यात आली. १ ऑक्टोबरपासून विकासकामांना सुरुवात करण्यात येणार असून  मेपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम संपविण्याचे नियोजन करण्यात आहे. मात्र आराखडय़ाच्या स्वरूपात सातत्याने होणारे आणि आर्थिक नियोजनाची गती पाहता प्रत्यक्षात या कामाला कधी सुरुवात होणार हा प्रश्नच आहे.

मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया वादात

महालक्ष्मी देवीची मूर्तीची झीज होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संवर्धन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी तो वादास कारणीभूत ठरला आहे. औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेपण प्रक्रिया केल्यानंतर मूर्तीची झीज होणार नाही असा दावा केला होता. पण त्यास सहा महिने उलटण्यापूर्वीच मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली. संवर्धन प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांसह भाविकांकडूनही केला जात आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी प्रकिया केली असता त्याच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्तकेली जाऊ लागली. मूर्तीवर  पांढरे डाग पडत असताना देवस्थान समिती केवळ आंधळेपणाने त्याकडे पाहात आहे. संवर्धन प्रक्रिया झाल्यानंतर त्याबाबतच्या अटी व नियम श्रीपूजक पाळत आहेत का, याचा खुलासा करण्याची मागणी करीत शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला. पुरातत्त्व विभागाने मात्र मूर्तीला काहीही होणार नाही असा दावा ठाम ठेवला आहे. मुळात देवीच्या मूर्तीची झीज लक्षणीय प्रमाणात झाली आहे. मूर्ती चारवेळा भंगलेली आहे. तिला जोड देऊन उभे केले आहे. मूर्तीची झीज पाहता पूजाविधी दुसऱ्याच मूर्तीवर केला जातो. यामुळे िहदू जनजागृती समितीनेसुद्धा भंग पावलेली मूर्ती बदलण्यात यावी अशी मागणी करून आंदोलनही केले आहे. तर ही बाब लक्षात घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेली अंबाबाईची दुसरी मूर्ती देण्याची तयारी शिल्पकार अशोक सुतार यांनी दर्शविली आहे.

देवस्थान व्यवस्थापन समितीचा घोटाळा

महालक्ष्मी देवस्थानसह ३०६७ मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला आहे. सुमारे ७०० कोटी रुपयांची जमीन गायब होण्यासह  देवस्थान समितीच्या कारभारात प्रचंड अनियमितता असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला. देवस्थान समितीतील गरव्यवहाराविरोधात सामाजिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. या समितीच्या अहवालात अनेक गंभीर मुद्दे मांडण्यात आले आहेत. मात्र इतके होऊनही भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्यांवर कारवाई होण्याच्या दृष्टीने कोणतीच पावले पडत नाहीत, असा आरोप  हिंदू जनजागृती समितीचे अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला आहे.

श्रीपूजक बदनामीचा डाव

वातावरण तापवले जात असताना श्रीपूजकांनी आपली भूमिका विशद केली. विनाकारण आम्हाला बदनाम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. घागरा-चोळी नेसवण्याचा प्रकार हा राजस्थानातील खोडीयार माता देवीच्या पूजेशी साधम्र्य असणारा आहे. यापूर्वीही अशा स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती. भारतीय संस्कृतीतील एक पोशाख जो एका देवीचा, लाखो माता-भगिनींचा आहे, त्यामध्ये श्री आदीशक्ती जगदंबेची अलंकार पूजा बांधणे यात काहीही गर नसल्याचे श्रीपूजक माधव मुनिश्वर यांचे म्हणणे आहे. तर राजर्षि शाहू महाराज यांच्या वटहुकूमाचा आम्हीही आदर राखतो असे स्पष्ट करताना अ‍ॅड. केदार मुनिश्वर यांनी श्रीपूजकांच्या हक्कांबाबत न्यायालयीन दाव्यामध्ये आमची बाजू रास्त ठरविण्यात आली होती. त्यामुळे या तथाकथित वटहुकूमावरून श्रीपूजकांना सरकारी नोकर ठरविणे हास्यास्पद आहे. श्रीपूजकांचा पूजोपचाराचा परंपरेने चालत आलेला अधिकार हा कायदेशीरदृष्टय़ा ग्राह्य़ धरला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नव्या वादाची भर

पंधरवडय़ापूर्वी एका भक्ताने दिलेली घागरा-चोळी देवीला नेसवण्यात आली. यावरून भक्तांमध्ये संतापाची लाट  उसळली. पारंपरिक गोल साडी नेसवण्याची प्रथा असताना आर्थिक अमिषापोटी पुजाऱ्यांनी घागरा-चोळी नेसवून भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आक्षेप शिवसेना, सामाजिक संघटना यांनी घेतला आहे. या विषयावरून श्रीपूजकांना लक्ष्य केले आहे. तर हा वाद ताजा असताना अंबाबाईच्या भक्तांनी मंदिरातील पुजाऱ्यांना हटवावे या मागणीवरून नवा वाद मांडला.

First Published on June 22, 2017 1:35 am

Web Title: marathi articles on kolhapur mahalakshmi temple