बंदी आदेश झुगारत महाराष्ट्रातील नेत्यांची मेळाव्यास उपस्थिती

कर्नाटक सरकारने मराठी भाषकांवर दडपशाही सुरूच ठेवली असताना सोमवारी मराठी भाषकांनी एकजुटीचे दर्शन घडवत मेळावा यशस्वी केला. महामेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांनी उपस्थित राहू नये यासाठी बंदी आदेश घालण्यात आला. पण  तो झुगारून माजी वित्तमंत्री, आमदार जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील यांनी मराठी भाषकांच्या लठय़ाला पाठबळ देत त्यांची ऊर्मी वाढवली. यापूर्वी असे बंदी आदेश झुगारून शरद पवार आणि छगन भुजबळ बेळगावात पोहोचले होते.

बेळगाव येथे सोमवारी कर्नाटक विधी मंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. बेळगावात अधिवेशन भरवण्यास मराठी भाषकांचा पूर्वीपासून विरोध आहे. त्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून महामेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र  सीमावासीयांचा महामेळावा हाणून पाडण्याचा प्रयत्न कर्नाटक प्रशासनाने चालवला होता.

या मेळाव्याला येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश लागू केला आहे. या मेळाव्यातील भाषणातून भाषिक तेढ निर्माण होण्याच्या शक्यतेने हा बंदी आदेश लागू केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. इतक्यावर न थांबता जिल्हाधिकारी एस. जिया उल्ला यांनी कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्राच्या सर्व सीमा सीलबंद करण्याचा आदेश दिला होता.

गनिमी काव्याने प्रवेश

अखेर महाराष्ट्रातील नेत्यांनी गनिमी काव्याचा वापर केला. आमदार जयंत पाटील यांनी गणवेश बदलून आजरामाग्रे शिनोळी येथून बेळगावात दुचाकीवरून प्रवेश मिळवला. महाडिकही दुचाकीवरून प्रवेश करते झाले. कुपेकर या मदानात चालत आल्या. हे तिघेही मंचावर पोहोचल्यावर संयोजकांनी महाराष्ट्रातील नेते सीमावासीयांना पाठबळ देण्यासाठी आल्याचे जाहीर केल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला, तर कर्नाटक पोलिसांची तोंडे पाहण्यालायक झाली होती.