कर्नाटकाच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात सोमवारी आयोजित महामेळाव्याला राष्ट्रवादीच्या आमदार – खासदारांनी वेषांतर करून बेळगावात घुसून कर्नाटक पोलिसांना गुंगारा दिला. मराठी भाषकांची लढण्याची उमेद वाढवली. त्यांच्या वेषांतराची कुतूहलपूर्ण चर्चा रंगली असताना अशाच प्रकारे पूर्वीही कर्नाटक प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन सीमालढा गाजवणाऱ्या प्रसंगाच्या आठवणी सीमावासीयांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. तर, अनेक नेत्यांना मारहाण, अटक होऊनही त्यांनी सीमाप्रश्नी आपली बांधीलकी दाखवून दिली आहे.

कर्नाटक शासनाने गेली सहा दशके मराठी भाषकांवर अन्याय, अत्याचार सुरू ठेवले आहेत. काही ना काही कारण शोधून मराठी माणसांचा आवाज आणि सीमाप्रश्नाची चळवळ दडपण्याचा त्यांचे अव्याहत प्रयत्न सुरू आहेत. त्याला पुरून उरत मराठी बांधवानी प्राणपणाने आपला लढा सुरू ठेवला आहे, तर या लढय़ाला ताकद देण्यासाठी महाराष्ट्रातील पक्ष, नेते यांचे प्रयत्नही कायम आहेत. याचीच प्रचीती सोमवारी बेळगावात आली. बेळगाव जिल्हा प्रशासनाची बंदी झुगारून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनी बेळगाव गाठले. पण याहीपूर्वी काही प्रमुखांनी बेळगावात केलेला शिरकाव अंगावर काटा आणणारा आहे.

पत्रकार पांडे, इकबाल शेख आणि भुजबळ

सीमालढय़ातील एक कटू पान म्हणजे १९८६ सालचा लढा. मराठीद्वेष्टय़ा कर्नाटक शासनाने कन्नड सक्तीचा आदेश लागू करून मराठी भाषकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. साहजिकच सीमाभागातून त्याला जोरदार विरोध होऊन चळवळ उग्र बनली. एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून सीमालढय़ाला ताकद देण्याचा निर्णय झाला. सर्वच पक्ष हिरिरीने यात उतरले. सीमावासीयांच्या पाठीशी राहणारी शिवसेनाही सरसावली. शिवसेना लढय़ात उतरणार म्हटल्यावर कर्नाटक प्रशासन जागे झाले. कारण सेनेची ‘हटाव लुंगी’ ही घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली होती. इकडे सेनेने छगन भुजबळ यांच्याकडे या मोहिमेची सूत्रे सोपवली. आंदोलनाच्या चार दिवस अगोदरच भुजबळ कामाला लागले.

धाडसी लढय़ाला तोंड देण्यापूर्वी भुजबळांनी बाह्य़ा सरसावल्या. त्यांनी पहिले काम केले ते शेजारच्या सलूनमध्ये जाऊन मिशी उतरवली. मुंबईतून विमानाने पणजी गाठली. सोबत बाळ तावडे होते. झब्बा, लेंगा, शबनम आणि मिशीविरहित भुजबळ पणजी विमानतळावर उतरले तेव्हा त्यांनी ‘पत्रकार पांडे’ असे नामकरण केले. अशाही अवतारात त्यांना विमानतळावर पत्रकार नारायण आठवले व किरण ठाकूर यांनी ओळखले होते. पणजी मुक्कामात भुजबळांनी आपल्या अवतारात आणखी बदल केला. दुसऱ्या दिवशी मोटारीने ते बेळगावला जायला निघाले तेव्हा ‘इकबाल शेख’ हे नाव धारण केले. सिगार ओढणारा शेख हा पाइप विक्रेता असल्याचे भासवले गेले. रस्त्यात कर्नाटक पोलिसांनी अडवल्यावर शेजारी कन्नड बोलणारा सोबती ‘आम्ही बेळगावला पाइप विक्रीसाठी चाललो असल्याचे’ सांगे. ते पटावे यासाठी मोटारीत पाइपचे काही नमुने ठेवले होते.

दोन दिवस अगोदरच बेळगावात पोहचलेल्या भुजबळांनी एका व्यापाऱ्याच्या घरी मुक्काम केला. आंदोलनाच्या आधी अर्धा तास ते बाहेर पडले ते झब्बा, लेंगा परिधान करत आणि कर्नाटक शासनाच्या विरोधात घोषणा देत. ते शिवाजी चौकात पोहचल्यावर पोलिसांनी त्यांना घेरले. बेदम मार दिला. पुढे दोन महिने त्यांना अटकेत राहावे लागले. कर्नाटक पोलिसांनी सारी शक्ती पणाला लावली असतानाही बेळगावात पोहचून आंदोलन तडीस नेल्याचा आनंद भुजबळांना होता. हा आनंद ते पुढे नेहमी सीमालढय़ाचा विषय आला की हमखास बोलून दाखवत.