प्रसारमाध्यमांमध्ये मराठी भाषेची मोडतोड होत असल्याचे मान्य करावे लागेल. याचवेळी नव्या जीवनशैलीमध्ये येणारे शब्द स्वीकारून मराठी भाषा प्रवाहित ठेवण्याचे कामही याच प्रसारमाध्यमांना करावे लागेल, असा सूर येथे झालेल्या परिसंवादामध्ये ज्येष्ठ माध्यमकर्मीनी व्यक्त केला.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने आयोजित २७ व्या साहित्य संमेलनामध्ये ‘मराठीचे भवितव्य आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. चच्रेत भाग घेताना ज्येष्ठ माध्यमकर्मीनी मराठी भाषेचा वापर करताना प्रसारमाध्यमांकडून चुकीच्या पद्धतीने होणारा वापर, इंग्रजीचे वाढलेले महत्त्व, भाषांचा बदलता आयाम या विषयी भूमिका स्पष्ट केली.
चच्रेला सुरुवात करताना चारुदत्त जोशी यांनी मराठी-इंग्रजी असा वाद न घालता संवाद ठेवण्याची गरज व्यक्त केली. वाचक, प्रेक्षकांना मूळ घटना प्रभावीपणे समजण्यासाठी मातृभाषेचा वापर करताना अॅडेड फ्लेवर म्हणून इंग्रजीचा वापर योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले.
विजय जाधव यांनी मराठीचे भवितव्य चांगले असले तरी सध्या तिच्या वापरावरून चिंतेची वेळ आली असल्याकडे लक्ष वेधले. प्रसारमाध्यमांनी अर्थकारण म्हणून मराठीकडे न पाहता आपली जबाबदारीही पार पाडण्याची गरज व्यक्त केली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मराठी भाषा बिघडत जात असल्याच्या मुद्यावरून चिंता व्यक्त करून दशरथ पारेकर यांनी मराठी भाषेची दुर्दशा प्रसार माध्यमांमध्ये होत असल्याने वाचक, श्रोत्यांनी ही बाब ठणकावून माध्यमांपर्यंत पोहचवण्याची आवश्यकता व्यक्त केली.
मराठी भाषा बिघडल्याचा कंठशोष जुना असला तरी ती संपणार नाही, असा उल्लेख करून श्रीराम पवार यांनी मराठी भाषा प्रवाहित करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी कसूर करता कामा नये, असे सांगितले.
परभाषांचे विद्रूपी अनुकरण मराठी प्रसारमाध्यमांमध्ये होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून श्रीराम पचिंद्रे यांनी हा दोष टाळून मराठी भाषेचा जबाबदारीने वापर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. गोव्यातील मराठी-कोकणी भाषेतील वादाकडे लक्ष वेधून महाराष्ट्राने तेथील लढय़ाला ताकद देण्याची गरज व्यक्त केली.