कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यतील आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

हिवाळी अधिवेशनासाठी नागपुर येथे असणाऱ्या आमदारांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना खंडपीठाच्या आवश्यकतेबाबत सविस्तर माहिती दिली. ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वाच्या उपस्थितीत लवकरच मुंबईत बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले.

कोल्हापुरात खंडपीठ सुरू करण्यासाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकार, लोप्रतिनिधी, नागरिक यांचा गेली तीन दशके लढा सुरू आहे. दोन वर्षांपासून सहा जिल्ह्यंतील सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांनी वारंवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री केवळ आश्वसन देत राहिले. आता या सर्वाच्या नव्या शासनाकडून खंडपीठ सुरू होण्याबाबत अपेक्षा आहेत.

सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी एन पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, राजू आवळे, सुरेश खाडे, शहाजी पाटील, शेखर निकम, वैभव नाईक, महेश शिंदे, विश्वजित कदम, विक्रम सावंत, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण आदी आमदार उपस्थित होते.