पोलंड आणि कोल्हापूर यांच्यातील ऋणानुबंधांच्या तब्बल ७२ वर्षांच्या आठवणी आज पुन्हा जागा झाल्या. निमित्त होते कोल्हापूर जिल्ह्य़ातील वळीवडे गावी या दोन प्रदेशातील नात्याच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेल्या स्तंभाच्या उद्घाटनाचे आणि ज्याला उपस्थित होते पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सीन प्रीझीदॅज यांच्यासह शेकडो अन्य पोलीश नागरिक.

दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूर संस्थानने आश्रय दिला होता. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पोलंडच्या राष्ट्रपतींना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले होते. १९४३ ते १९४८ या पाच वर्षांच्या काळात पाच हजार पोलंडवासीय वळीवडे येथे राहायला होते. या काळात इथली संस्कृती, इथले नियम त्यांनी शिस्तप्रिय पद्धतीने स्वीकारले होते. पोलंड आणि कोल्हापूर यांचे आंतरिक नाते आजही कायम आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी वळीवडे गावात दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात दिसून आला.

फेटे बांधून फुलांची उधळण, ढोल-ताशांच्या निनादात औक्षण करत कोल्हापूरकरांनी पोलंडवासीयांचे वळीवडे येथे स्वागत केले. ‘ऐतिहासिक आणि भावनिक नात्याबरोबरच कोल्हापूर परिसरात उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक, पर्यटन यामध्ये आदान-प्रदान केले जाईल,’असे आश्वासन पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सीन प्रीझीदॅज यांनी दिले. सुरुवात दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने झाली. संभाजीराजे छत्रपती यांनी वळीवडे येथील वास्तव्याला पोलंडवासीय आपले दुसरं घर मानतात. येथे ऐतिहासिक मानवतेचा संदेश देणारे संग्रहालय उभारण्यात येणार आहे, असे नमूद केले.

सासूबाईंचा प्रेमविवाह

माझ्या सासूबाई मालती वसंत काशीकर (पोलंड येथील नाव वाँडरव्हिक्स) या १९४२ च्या काळात भारतात आल्या. त्यांना ब्रिटिशांकडे नोकरीस असलेले माझे सासरे वसंत काशीकर हे आवडले. या दोघांचे पुढे प्रेम आणि विवाह झाला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सर्व पोलिश नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र माझ्या सासूबाई येथेच कोल्हापूरच्या होऊन राहिल्या. तेव्हापासून पोलंड आणि काशीकर कुंटुबाचे ऋणानुबंध कायम आहेत. माझे आई-वडीलसुद्धा ७२ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. आज त्यांचे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी  मी या भूमीत आले.

– ईवा क्लार्क

कोल्हापूरच्या मातीशी समरस

माझी बहीण क्रोस्टिना आणि मी त्यावेळी भारतात आलो आणि या मातीशी समरस झालो. आज क्रोस्टिना हयात नाही. तिची मुलगी ईजाबेला कोझीयाली आज माझ्यासोबत या भेटीला आली. त्यावेळेस आम्हाला इतके प्रेम मिळाले की, कोल्हापूरही आमची भूमीच झाली.

– ओल्फ

मनात भारत

भारत ही पवित्र भूमी आहे. या भूमीत वास्तव्यास असताना मी ११ वर्षांची होते. कोल्हापूरची ही आठवण मी आजही माझ्यासोबत ठेवली आहे.

– लुडमिला जॅक्टोव्हिझ