23 April 2019

News Flash

सततच्या आंदोलनांचा दूध संकलनावर परिणाम

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, ग्राहकांचीही गैरसोय

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, ग्राहकांचीही गैरसोय

विविध कारणांनी गेला पंधरवढा हा धामधुमीचा ठरल्याने त्याचा दूध संकलनावर आणि विक्रीवरही मोठा परिणाम झाला. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले दीर्घ आंदोलन, मराठा समाजाचे दोनवेळचे बंद, यामुळे दुधाच्या व्यवहारावर विपरीत परिणाम झाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना संकलनाअभावी फटका बसला तर महानगरांना पुरेसा दूध पुरवठा न झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली आहे. प्रशासन, पोलीस यांनाही दुधासारख्या अत्यावश्यक पदार्थाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागत असल्याने त्यांच्यावरही याचा ताण येत आहे.

घर असो की हॉटेल , मिठाईची दुकाने दुधाची गरज नित्याची. ‘पहिला चहा’ झाल्याशिवाय अनेकांचा दिवसच सुरु होत नाही. मात्र, गेल्या दोन, तीन आठवडय़ात वेगवेगळ्या कारणांनी दुधाची पुरेशी उपलब्धता होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढ  मिळावी या मागणीसाठी नुकतेच आंदोलन केले. त्या वेळी तब्बल आठवडाभर दूध संकलन होऊ  शकले नाही.

एकटय़ा कोल्हापूर जिल्ह्यतून मुंबई, पुणे अशा महानगरांना होणारा सुमारे १० लाख लिटरचा पुरवठा ठप्प झाला. ग्रामीण भागातून रोजचे २० लाख लिटर दूध संकलन झाले नाही. या काळात शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले, पण शासनाने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या काळात दूध पुरवठय़ाची यंत्रणा विस्कळीत झाली. परिणामी, महानगरांत दुधाची टंचाई झाली. तेथील ग्राहकांची परवड झाली.

शेतकरी आंदोलनाची सांगता झाली आणि लगेचच सकल मराठा समाजाचे आरक्षण मागणीसाठी ‘ठोक आंदोलन’ सुरु झाले. या काळात एका कार्यकर्त्यांने आत्महत्या केल्याने वातावरण तापले. राज्यभर अघोषित बंद झाला. आंदोलनाला हिंसक वळण लागले. याचा परिणाम दूध वाहतुकीवर होऊ लागला. एसटीपाठोपाठ अनेक ठिकाणी दुधाच्या टंॅकरवरही हल्ले झाले. दूध वाहतुकीसाठी संरक्षणाची मागणी होऊ लागली. ती पुरवताना पोलिसांची दमछाक झाल्याने अखेर अनेक संघांनी दूध संकलनच कमी केले. दरम्यान या आंदोलन काळात दोनदा महाराष्ट्र बंदची हाक दिली गेल्याने त्या वेळी तर अनेक दूध संघांनी दूध संकलन न करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सर्वात मोठय़ा गोकुळ दूध संघाचे गुरुवारी सकाळी सव्वा पाच लाख लिटर दूध संकलन होऊ  शकले नाही. राज्यातील अन्य संघांची आकडेवारी एकत्र केली तर हा आकडा खूप मोठा होतो. संकलित न झालेल्या या दुधाचा पहिला फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, तर याचा पुरवठा न होऊ शकल्याने ग्राहकांनाही याची झळ बसली आहे.

दूध संघांचे कोटय़वधीचे नुकसान

दरम्यान गेल्या पंधरवडय़ातील ही तणावाची स्थिती निवळत असल्याने दूध संकलन आणि महानगरांचा पुरवठा आता सुरळीत होईल , असे ‘गोकुळ’चे दूध संकलन अधिकारी शरद तुरुंबेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान काल एक दिवस संकलन बंद केल्यामुळे ‘गोकुळ’ला सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. महिन्याभरातील सततचे हे बंद, दूध संकलन करणाऱ्या वाहनांची मोडतोड, संकलनातील अडचणी, अन्य साहित्यांचे नुकसान यामुळे दूध संघांच्या नुकसानीचा हा आकडा कोटय़वधींमध्ये जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

First Published on August 11, 2018 4:16 am

Web Title: milk movement in maharashtra 6