News Flash

पश्चिम महाराष्ट्रात दूध दर आंदोलन

आंदोलनात भाजपबरोबर रयत संघटना सहभागी

कोल्हापुरात भाजपच्या वतीने दुध दरासाठी राष्ट्रीय महामार्गावर धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये आणि दूध भुकटीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी शनिवारी भाजपच्या वतीने सातारा, सांगली आणि कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. यामध्ये रयत क्रांती संघटनेने सहभाग घेतला. आंदोलनात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवून दूध ओतून देण्यात आले तर काही ठिकाणी ते नागरिकांना वाटण्यात आले.

कोल्हापुरात दूध व दूध भुकटी निर्यातीस अनुदान द्यावे आदी मागण्याच्या वतीने भाजप, रिपाइं, रयत क्रांती संघटना, महासंग्राम आदी पक्ष, संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. शहर भाजपच्यावतीने शाहूपुरी येथे महानगराध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सर्व तालुक्यांमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूरजवळ पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी खासदार धनंजय महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भगवान काटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी गरिबांना दूध वाटण्यात आले.

‘रयत’चे आक्रमक आंदोलन

दरम्यान, भाजप शांततेने आंदोलन करीत असताना रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले. त्यातील दूध ओतून नासाडी केली. दरम्यान, आंदोलनाची खबरदारी घेत गोकुळ दूध संघाने सकाळी आठ वाजता सतरा टँकरमधून सुमारे सव्वातीन लाख लिटर दूध मुंबई, पुणे येथे रवाना केले. हे टँकर गेल्यानंतर गोकुळचे नेते महाडिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग अडवण्याच्या आंदोलनाची चर्चा होती.

साताऱ्यात आंदोलन

वाई : भारतीय जनता पक्षाने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. या दूध उत्पादकांना सरकारने मदतीचा हात द्यावा व दूध दरवाढ करावी अशी मागणी शिवेंन्द्रसिंहराजे यांनी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सरचिटणीस सुश्मिता शहा यांच्या नेतृत्वाखाली पोवईनाका व मोती चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी विकास गोसावी, विक्रांत भोसले, विठ्ठल बालशेठवार, विक्रम बोराटे आदी सहभागी झाले होते.

फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजपा, रासप, रयत क्रांती संघटना या महायुतीच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

कराड येथे डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली दूधदरवाढ मागणी आंदोलन करण्यात आले. सरकारचा निषेध करत दूध पिशव्यांचे वाटप करण्यात आले. दूध दरवाढीसाठी लोणंद येथे आंदोलनात अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालेच पाहिजे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. यावेळी मोहन क्षीरसागर, भिकाजी शेळके, शरद शेळके, दत्ता शेळके या दूध उत्पादक उपस्थित होते. वाई येथेही दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेत भाजपने आंदोलन केले. यामध्ये राकेश फुले, सचिन घाटगे, यशवंत लेले, काशिनाथ शेलार आदी सहभागी झाले होते.

राज्य सरकार आंधळे, बहिरे आणि मुके – खोत

पंढरपूर : भाजपा आणि मित्र पक्षाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा दिला होता.  पंढरपूर येथे रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला, तर पंढरपूर येथील नामदेव पायरी येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने आ.सदाभाऊ खोत यांनी पांडुरंगचरणी दुग्धाभिषेक केला. हे सरकार आंधळे, मुके आणि बहिरे आहे. बा विठ्ठला सरकारला बुद्धी दे अशी टीका आ. सदाभाऊ खोत यांनी केली. दुधाला ३० रुपये दर मिळावा, प्रतिलिटर दुधाला १० रुपये अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी महायुतीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचे पडसाद रात्रीपासून पंढरपूर येथे उमटू लागले. पंढरपूर -मंगळवेढा आणि पंढरपूर-सातारा रस्त्यावर टायर जाळण्याची घटना घडली.   खोत यांनी नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाच्या प्रतीकात्मक मूर्तीवर दुधाचा अभिषेक केला. या वेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रणव परिचारक, बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माउली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के  आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:06 am

Web Title: milk price agitation in western maharashtra abn 97
Next Stories
1 दूध दरवाढीसाठीचे आंदोलन म्हणजे भाजपाची अस्तित्वासाठीची स्टंटबाजी – सतेज पाटील
2 साखरेचा बफर स्टॉक बंद करण्याच्या केंद्राच्या निर्णयावरुन मुश्रीफांचा फडणवीसांना चिमटा
3 कोल्हापुरात नव्या २०० रुग्णांची भर
Just Now!
X