25 November 2017

News Flash

दूध खरेदीच्या दरवाढीचा फटका ग्राहकांनाच?

शेतकऱ्यांच्या संपात तोडगा काढण्याच्या उद्देशाने सरकारने दुधाच्या दरात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.

दयानंद लिपारे, कोल्हापूर | Updated: June 21, 2017 2:49 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

 

खरेदी दरात तीन रुपये वाढीनंतर दूध संघ तोटा सहन करणे कठीण

शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याकरिता राज्य सरकारने दुधाच्या खरेदीच्या दरात तीन रुपये वाढ करताना त्याचा फटका ग्राहकांना बसणार नाही, असे जाहीर केले असले तरी दुध संघ तोटा सहन करणार का, असा प्रश्न आहे. सरतेशेवटी या वाढीचा फटका ग्राहकांनाच बसू शकतो, असेच एकूण चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या संपात तोडगा काढण्याच्या उद्देशाने सरकारने दुधाच्या दरात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार दुधाच्या खरेदी दरात तीन रुपये प्रति लिटरला वाढ करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय जाहीर करताना त्याचा फटका ग्राहकांना बसणार नाही, असा दिलासा सरकारच्या वतीने देण्यात आला. सरकारच्या या निर्णयाबद्दल दूध उत्पादक शेतकरी मात्र  समाधानी नाहीत. या निर्णयानंतरही अर्थकारण जमत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.  म्हशीच्या एका वेताचा कालावधी दीड  वर्षांचा असतो . यातील निम्मा काळ ती दूध देते तर बाकीचा काळ भाकड पकडला जातो . या कालावधीत एक म्हैस सुमारे दीड  हजार लिटर दूध देते . या दुधाची विक्री ३३ रुपयांवरुन ३६  रुपये प्रमाणे केली तरी शेतकऱ्यांच्या हाती येतात सुमारे ५५ हजार रुपये एका म्हशीमागे येतात. तिच्या वैरण , पशुखाद्य , वीज , मजुरी , औषध , गोठ्याचा भांडवली खर्च , दैनंदिन व्यवस्थापन आदी खर्च हाच मुळी  उत्पन्नापेक्षा अधिक होतो , असे पन्हाळा तालुक्यातील शेतकरी युवराज आडनाईक यांनी सांगितले . शेतकरी जोड धंदा , शेतातील वैरण , शेतीकामातून उरलेलय  वेळात दुधासाठी राबत असल्याने कशीतरी तोंडमिळवणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले . त्यामुळे वाढीव तीन रुपये एकूण खर्चाच्या तुलनेत खूपच अपुरे असून दूध किमान ५० रुपये प्रमाणे विकत घेतले तरच शेतकरी दूध व्यवसायातून काही तरी फायदा मिळवू शकेल , असे शेतकऱ्यांचे म्हणणे  आहे .

दूध संथांना तोटा

पुरेशा गांभीर्याने विचार न करता शासनाने दूध दरवाढीचा निर्णय घेतला असल्याचे दूध महासंघांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दूध दरवाढ करताना ती संस्था व शेतकरी  यांना कशी परवडणारी आहे  यासाठी  कसलाही आधार शासनाने घेतला  नाही , असे ‘इंडियन डेअरी असोसिएशन’ या संस्थेचे  अध्यक्ष व  ‘गोकुळ ’दूध संघाचे माजी अध्यक्ष  अरुण नरके यांचे म्हणणे आहे. गोकुळ आधीपासूनच इतरांपेक्षा अधिक दर  देत आहे .

आता शासन निर्णयाप्रमाणे दूध खरेदी करताना केवळ गाईच्या दूध खरेदीसाठी वर्षांकाठी ४० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या निर्णयाने संस्था आणखी तोटय़ात जातील पण उत्तम चाललेल्या सहकारी संस्थांना याचा नाहक फटका सहन करावा लागेल आणि या संस्था अडचणीत येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ’अमूल ’ सारख्या वजनदार संस्थांशी आता स्पर्धा करावी लागत आहे . या आव्हानाचा सामना जिल्’ाातील सहकारी दूध संस्थांना  करावा लागत असताना आता या नव्या  समस्याची  भर पडल्याने  सहकारी दूध संस्थांच्या  गोटात नाराजीची छटा आहे .

दरवाढीची शक्यता

गोकुळ अधिक दर देतानाच शेतकरयांना अन्य सुविधाही मोठया प्रमाणात पुरवत असते .त्याचा खर्चही लक्षणीय असतो . दूध दरवाढीमुळे पडणारा आíथक बोजा सहन होणार नाही . यामुळे संचालक मंडळात आगामी काळात दूधदरवाढीचा निर्णय घ्यावा लागेल , असे संस्थेचे कार्यकारी संचालक डी . व्ही . घाणेकर यांचे म्हणणे आहे .

भुकटीची  समस्या

  • केवळ दूध दर नव्हे तर दर  फरकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक पसे कसे मिळतील याचा विचार वारणा दूध संघ करतो , असा उल्लेख करून वारणा उद्योग समूहाचे प्रमुख व माजी मंत्री विनय कोरे यांनी दूध दरवाढीच्या निर्णयानंतर दूध पावडरीचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता वर्तवली .
  • वाढीव दराने दूध खरेदी करण्याने सहकारी दूध संस्थांना खर्च तितकीच जमा , तोटा , नफ्यात नुकसान अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आíथक स्थितीला सामोरे जावे लागणार आहे . सध्या रमजान महिना , ईद मुळे दुधाला मागणी आहे .
  • जुलच्या पहिल्या आठवड्यात शासन निर्णयाचे परिणाम जाणवायला लागतील . अशावेळी दुधाची पावडर करण्याकडे कल  राहील . दूध संस्थांची आíथक स्थिती पाहता राज्यशासनाला दूध पावडर खरेदी करावी लागेल , असे कोरे यांनी सूचित केले .
  • हि शक्यता गृहीत धरता दूध संस्थांवर तीन रुपये ज्यादा दराने दूध खरेदी करण्यास भाग पडून तटस्थ राहणारया शासनालाच दूध पावडर खरेदी करण्यासाठी तिजोरीतील काही रक्कम खर्च करण्यासाठी पुढे यावे  लागण्याची चिन्हे आहेत .

First Published on June 21, 2017 2:49 am

Web Title: milk purchase rates increases milk union