१५ लाख लिटर दूध पुरवठा खंडित, भाजीपाला सडला

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ाला बसलेल्या महापुराच्या फटक्याने पुणे, मंबई महानगरांसह अन्य ठिकाणी होणारा दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा ठप्प झाला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांपासून दूध संकलन थांबले असून संकलित झालेल्या दुधाचा पुरवठाही शहरांकडे होऊ शकलेला नाही. याशिवाय या महापुराने शेतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली गेल्याने हा सर्व भाजीपालाही सडला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत या भागातून पुण्या-मंबईकडे भाजापाल्याची निर्यात होऊ शकणार नाही.

कोल्हापूर जिह्यत अतिवृष्टीचा फटका सर्व घटकांना बसत आहे. कोल्हापूर हा  दूध उत्पादनातील अग्रेसर जिल्हा आहे. कोल्हापुरातील गोकुळ, वारणा या दोन मोठय़ा दूध संघांचे दूध मोठय़ा प्रमाणात बाहेर विकले जाते. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील राजारामबापू,हुतात्मा, चितळे यांच्या दुधाच्या विक्रीचे प्रमाणही मोठे आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात महापुराचे थैमान सुरू आहे. जिल्हा, राज्य मार्ग बंद झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातून गेल्या तीन दिवसांपासून दूध संकलन होऊ  शकलेले नाही. राज्यातील सर्वात मोठय़ा गोकुळ दूध संघाने तर कालपासूनच दूध संकलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या साऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून मोठय़ा शहरांकडे जाणारे सुमारे १५ लाख लिटर दूध पोहोचू शकलेले नाही. याचा आर्थिक फटका सहकारी, खासगी दूध संघासह दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे.

आर्थिक झळ

गोकुळ संघावर झालेला परिणामाविषयी संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले की, संघाच्या बल्क कुलर केंद्रात असलेले दूध तेवढेच शिल्लक आहे. हे दूध कोल्हापूर शहराला पुरवणे शक्य आहे. मात्र, रोजचे ९ लाख लिटर संकलन ठप्प झाले आहे. परिणामी, मुंबई शहराचा ७ लाख, पुणे शहराचा अडीच लाख लिटर तसेच गोवा, सिंधुदुर्ग, चिपळूण, सातारा जिल्ह्यातील ५० हजार लिटर दूध पुरवठा होऊ  शकला नाही. संकलन आणि विक्री दोन्हीवर परिणाम झाल्याने ‘गोकुळ’ला रोज सुमारे नऊ  कोटी रुपयांचा फटका बसत आहे, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. वारणा दूध संघाचे जिल्ह्यातील तीन लाख लिटरचे संकलन ठप्प झाले आहे. मुंबईच्या ग्राहकांना दूध पुरवठा करण्यास असमर्थ ठरल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. दरम्यान, काही मोजक्या मार्गावरून दूध संघात येत आहे. मात्र किणी टोल नाका येथे दुधाचे टँकर प्रदीर्घ काळ अडकून पडले आहेत. हे टँकर संघात पोहोचताच दूध खराब (नासल्याचे) झाल्याचे दिसून येत असून याचाही आर्थिक फटका संघांना बसत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान या महापुराने शेतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. यामुळे या क्षेत्रावर तयार करण्यात आलेल्या लाखो टन भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुढील काही दिवसांत या भागातून पुण्या-मुंबईकडे भाजापाल्याची निर्यात होऊ शकणार नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या घरी गोकुळ

दूध हे उत्पन्नाचे साधन असल्याने प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन दूध उत्पादक शेतकरी अधिकाधिक दुधाची विक्री करून चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. आता दुधाचे संकलन ठप्प झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या घरी गोकुळ नांदते आहे. सारेच दूध घरी राहिल्याने दूधदुभत्याची चंगळ  होत असून आपत्तीच्या काळातही बाळगोपाळा मात्र खूश आहेत.