हसन मुश्रीफ यांची टीका

कोल्हापूर : गोकुळच्या मागील निवडणुकीमध्ये पैरा फेडण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाने सहकार्य सत्तारूढ गटाला केले, परंतु त्याची किंमत नेत्यांना राहिली नाही. अनेक वेळा अपमानित करण्याचे काम त्यांनी केले गेले अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे सर्वेसर्वा महादेवराव महाडिक यांना टीकेचे लक्ष केले आहे. गोकुळ संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव सत्तारूढ गटाकडून आला असताना याबाबत चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच महाडिक यांच्यावर मुश्रीफ यांनी तोफ डागल्याने चर्चेला सुरुवातीलाच खोडा बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुश्रीफ म्हणाले, गोकुळ किंवा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत माझी व गोकुळचे नेते, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचेबरोबर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले आहे. पी. एन. पाटील यांनी गोकुळबाबत जे वक्तव्य केले आहे ते अर्धसत्य आहे. गोकुळच्या बहुराज्य करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये फार मोठी अस्वस्थता असून त्याचे पडसाद लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमटले होते.

गेली पाच वर्षे म्हणजे आघाडीची सत्ता गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये आपसातील कुरघोडीमुळे दोन्ही काँग्रेसचे नुकसान होते. ते टाळणे अतिशय गरजेचे आहे. यावर आमचे एकमत होऊ न गोकुळ, जिल्हा बँक, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे प्रत्यंतर दिले. गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बहुराज्यच्या विषयावर पुन्हा आमचे मतभेद होऊ  नयेत, ही माझी भावना होती. त्याप्रमाणे बहुराज्य ठराव रद्द करण्याचे पाटील यांनी जाहीर केल्याने त्यांचे आभार मानले होते.

गोकुळच्या कारभाराबाबत मात्र माझी चर्चा झाली नव्हती. गोकुळच्या एकंदरीत सर्वच कारभाराबाबत माझे वेगळे मत आहे. पी. एन. पाटील यांचे बरोबर चर्चेवेळी ते मांडू. मागील निवडणुकीमध्ये सत्तारूढ गटाला सहकार्य करूनही त्याची जाणीव महाडिक यांना राहिली नाही. अनेक वेळा अपमानित करण्याचे काम केले गेले. गोकुळ दूध संघ सभासदांच्या व दूध उत्पादकांच्या मालकीचा राहिला पाहिजे, अशी माझी आग्रही भूमिका आहे, असे मुश्रीफ म्हणाले.