माफक दरात उपचार न केल्यास कारवाई

कोल्हापूर : करोनावर उपचार केल्या जाणाऱ्या रुग्णांकडून मोठी रक्कम आकारून रुग्णालयांनी गैरफायदा घेऊ नये. माफक दरात उपचार न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

कागल येथे मंत्री मुश्रीफ म्हणाले, जगभरात करोनाने थैमान घातले आहे. त्यावर लस दृष्टिक्षेपात आहे. सध्या करोनावर उपचार करून घेण्यासाठी लोक खासगी रुग्णालयात जात आहेत. मात्र या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून वारेमाप बिले घेतली जात आहेत; ही बाब भूषणावह नाही. लोकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणे योग्य नाही. मोठी बिले आकारून खासगी रुग्णालयांनी गैरफायदा घेऊ नये. रुग्णांवर माफक दरात उपचार करून, डॉक्टरांनी परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा. त्याबाबत तक्रारी येत असल्याने कारवाई करणे भाग पडेल. कोल्हापूर जिल्हा परिषदेत औषध खरेदी तक्रारीबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, औषध खरेदीसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक आदींची समिती आहे. हा सरकारी मामला असल्याने लेखापरीक्षण होणार आहे. याची सर्व जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावर आहे. विरोधकांनी संकट काळात आरोप करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

चुकीची तक्रार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याबाबत मुश्रीफ म्हणाले, चुकीची तक्रार केलेली आहे, असे मला वाटते. स्वत:ला ‘क्लीनचिट’ मिळवण्यासाठी कदाचित पाटील यांनी त्यांना तक्रार करायला लावली असेल. जनतेने निवडून दिलेल्या माणसाला त्रास देणारी मी व्यक्ती नाही.