कोल्हापूर

संभाव्य पूर परिस्थीतीवर मात करण्यासाठी दूरनियंत्रकावर आधारित ‘यू बोट’ आणि ४-अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) क्षमतेच्या २५ बोटी उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे केली. कोल्हापूरात मंत्री वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूर परिस्थिती आणि करोना साथ रोग प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

वडेट्टीवार म्हणाले, “कोविडच्या फार मोठ्या संकटाला थोपविण्याचे काम जिल्ह्याने केले आहे. मृत्यूदर १.६ टक्के असून, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात राज्यात जिल्हा आघाडीवर आहे. इचलकरंजी येथील आयजीएमसह कोविड काळजी, कोविड आरोग्य केंद्रांसाठी व्हेंटीलेटर, ऑक्सिजनची सुविधा आणि अनुषंगिक आरोग्य बाबींचा समावेश असणारा प्रस्ताव वैद्यकीय अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एकत्रित पाठवावा.”

यंदाचा पाऊस आणि उपाययोजना याबाबतही त्यांनी माहिती दिली. “संभाव्य पूर परिस्थितीसाठी एनडीआरएफच्या प्रत्येकी २५ जवानांची ३ पथके जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहेत. यंदाचा पाऊस लक्षात घेता पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील धरणात असणारा पाणीसाठा मर्यादित ठेवण्याबाबत पाटबंधारे विभागाने कार्यवाही सुरु करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने मागणी केलेला सुमारे ४१ कोटींचा निधी राज्याकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे”, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, राजेश पाटील यांनी नुकसान झालेल्या गावात भरपाई देण्याची मागणी केली आहे.