इचलकरंजी येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन पीडितेवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. संशयीत आरोपींमध्ये रोहित गजानन जाधव, सौरभ मकरध्वज माने, शुभम नितीन भोसले व शाकिब अब्दुल शेख या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

इचलकरंजी शहरात काल (दि.२८) पहाटे दिवाळी सणावेळी एक सात वर्षीय मुलगी आपल्या भावासोबत फटाके उडवत असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांच्या टोळक्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर त्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले आणि तिला आयको सुतगिरणीच्या माळावर सोडून पलायन केले. या मुलीला कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही माहिती समजल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने तिन्ही पोलीस ठाण्याचे एकूण १२ पथकं, कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा, इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, येथील तिन्ही व हुपरी प्रभारी अधिकारी, सर्व पोलीस उपनिरीक्षक यांनी 36 तास संयुक्त प्रयत्न करुन चौघा संशयितांचा शोध घेतला.

आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. आरोपींवर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दि. २७ रोजी रात्री विविध ठिकाणी याच आरोपींवर २ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.

दरम्यान, तपास पथकाला ५० हजार रुपयांचे पारितोषिकही जाहीर करण्यात आले आहे. तपास लवकरात लवकर पूर्ण करून ५० दिवसांच्या आत न्यायालयात परिपूर्ण दोषारोप दाखल करणार असल्याचे पोलीस उप अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले.