मराठी भाषकविरोधी संघटनेच्या आमंत्रणामुळे चर्चा

सीमाभागातील मराठी भाषा आणि मराठी भाषकांना नेहमी पाण्यात पाहणाऱ्या ‘कर्नाटक रक्षण वेदिके’ने राज्यातील मराठी भाषेचा कैवार घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. प्रादेशिक भाषा अस्मितेची मोट बांधण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे बंगळुरू येथे आयोजन केले आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी ‘कर्नाटकातील सीमा भागातील मराठी जनतेने कर्नाटकाला आपलेसे करत तिथेच राहावे’ अशा प्रकारचे विधान केले होते. या पाश्र्वभूमीवर ‘कर्नाटक रक्षण वेदिके’ने त्यांना दिलेले निमंत्रण हे विशेष मानले जाते.

‘कर्नाटक रक्षण वेदिके’च्या वतीने प्रादेशिक भाषा आणि तिच्या अस्मितेची मोट बांधण्यासाठी बंगळुरूत एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी हे एक दिवसीय चर्चा शिबिर होत आहे. देशभरात प्रादेशिक भाषा अस्मिता कडवटपणे जपणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांना या शिबिरासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये मनसे सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बंगळुरूमध्ये मेट्रो स्थानकांच्या हिंदी भाषेत नामकरणाचा वाद पेटला असल्याच्या पाश्र्वभूमीवर भाषिक अस्मिता तापवणाऱ्या या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तेलगू देसम, डीएमके, एआयडीएमके, तृणमूल काँग्रेस अशांना आमंत्रण देण्यात आलेय. भाषा अस्मितेसाठी प्रसंगी राज्यांमधले आपापसातले टोकाचे मतभेद बाजूला ठेवत हिंदी भाषा अतिक्रमण विरोधी लढा उभारण्यासाठी प्रादेशिक मोट बांधण्याचा ‘कर्नाटक रक्षण वेदिके’चा हेतू आहे.