राज्य शासनाच्या अवयवदान अभियानास कोल्हापूर जिल्ह्यतील जनतेकडून उत्स्र्फूत प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५ हजाराहून अधिक लोकांनी अवयवदानाचे अर्ज भरून नोंदणी केली असल्याची माहिती रविवारी देण्यात आली. पुढील काळातही हे अभियान गतिमान केले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी येथे सांगितले.

हरे माधव परमार्थ सत्संग समिती, माधवनगर, कटनी, शाखा गांधीनगरच्या वतीने सद्गुरू पर्व निमित्त गांधीनगर येथील सिन्धी सेंट्रल पंचायत हॉल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकारी एस. आर. माने, गांधीनगर वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

अवयवदान हे श्रेष्ठदान असल्याचे स्पष्ट करून डॉ. पाटील म्हणाले, मृत्यूनंतरही आपण अवयवदानाच्या स्वरूपात दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहू शकतो.

अवयवदानाच्या या उदात्त कार्याला जात, धर्म, लिंग यांचे बंधन नाही. आज देशात किमान ५ लाख रुग्ण मूत्रिपडाच्या आजाराने ग्रस्त असून हे रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. ५० हजार रुग्ण यकृताच्या म्हणजे लिव्हरच्या प्रतीक्षेत आहेत, तर २ हजार रुग्ण हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्य स्थितीत १२ हजारपेक्षा जास्त रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. अशा प्रकारच्या रुग्णांना आवश्यक अवयव उपलब्ध करून देऊन त्यांना एक नवीन जीवनदान देण्याच्या उद्देशाने अवयवदान चळवळ उभी असून जिल्ह्यातील जनतेने हे अभियान यशस्वी करण्यात सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हरे माधव परमार्थ सत्संग समितीच्या वतीने राम नागदेव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास डॉ. संभाजी पाटील, डॉ. वाडकर, सत्संग समितीचे विजय नागदेव, राम नागदेव, मनोहरलाल चेनानी, ईश्वरलाल लालवाणी, इंदर इराणी, रक्तदाते, नागरिक उपस्थित होते.