स्थानिक स्वराज्य संस्था गटातून निवडायच्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. विद्यमान सदस्य महादेवराव महाडीक, जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची शाहूपुरी येथील एका बँकेमध्ये बठक होऊन त्यामध्ये पक्ष ज्यास उमेदवारी देईल त्याच्या पाठिशी एकमुखाने राहण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बंद खोलीत नेमकी काय चर्चा होऊन धोरण ठरले हे निश्चितपणे कळू शकले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी जानेवारी महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे. ही निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील जागा काँग्रेस पक्षाकडे असल्याने इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे. महाडीक हे विद्यमान सदस्य असले तरी त्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याची तक्रार नवनिर्वाचित नगरसेवकांनी केल्याने त्यांच्या उमेदवारीत अडथळा निर्माण झाला आहे. याशिवाय, माजी मंत्री सतेज पाटील, पी.एन.पाटील, प्रकाश आवाडे यांनीही इच्छुकांच्या रांगेत आपला क्रमांक वर यावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
या पाश्र्वभूमीवर श्रीपतराव गोंद्रे सहकारी बँकेमध्ये सोमवारी दुपारी महाडीक, पाटील व आवाडे यांची एकत्रित बठक झाली. महाडीक, पाटील यांची चर्चा सुरू असताना तेथे काही वेळाने आवाडे आले. सुमारे दीड तास तिघांमध्ये बंद खोलीत चर्चा सुरू होती. बठकीचा सविस्तर तपशील त्यांनी दिला नाही. मात्र, तिघांनीही आपली उमेदवारीची दावेदारी असल्याचे नमूद करीत पक्षाकडून ज्यास उमेदवारी मिळेल त्याच्या पाठिशी खंबीरपणे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
सतेज पाटील विरोधात आघाडी?
सोमवारी बँकेत झालेल्या बैठकीस तिघे इच्छुक उपस्थित असले तरी महापालिका निवडणुकीत काँगेसला धवल यश मिळवून देणारे सतेज पाटील यांना बाजूला का ठेवण्यात आले, अशी चर्चा सुरू आहे. पाटील यांना वगळून तिघांनी आपली ताकद एकवटण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवून त्यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.