दयानंद लिपारे

मुंबई-पुणेप्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्क उभारण्याची घोषणा पुन्हा एकदा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. त्यांनी उद्योजकांशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर सुमारे १५० एकर जागेवर आयटी पार्क (माहिती तंत्रज्ञान बगिचा), लॉजिस्टिक पार्क आणि निवासी संकुल असा एकत्रित उद्योग निवास समूह उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली दहा वर्षे कोल्हापुरात आयटी, लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे केवळ ढोल पिटले जात  आहेत.

कोल्हापूरमध्ये आयटी उद्योग सुरू करण्यासाठी पूरक वातावरण आहे. कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. आयटी उद्योगासाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्याने आणखी जागा मिळावी असा उद्योजकांचा प्रयत्न आहे. मध्यंतरी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे बैठक झाली असता टेंबलाईवाडी येथील आयआरबी कंपनीला दिलेल्या संकुलावर भूखंडावर आयटी पार्कसाठी तीन भव्य मनोरे उभारण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिकेने पायाभूत सुविधा पुरविण्याची तयारी दर्शवली असताना त्यातून पालिकेच्याच तिजोरीत काही भर पडावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. हे प्रयत्न एकीकडे सुरू असताना आता उद्योगमंत्री देसाई यांनी शंभर एकर जागेमध्ये आयटी पार्क सुरू करण्याची घोषणा केली आहे.

कोल्हापूरमध्ये आल्यानंतर देसाई यांना उद्योगासाठी काही तरी भरीव घोषणा करण्याची जणू सवय आहे. करोना टाळेबंदीत उद्योजकांशी झालेल्या बैठकीवेळी त्यांनी कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. लॉजिस्टिक पार्कची कल्पना बोलून दाखवली होती. वस्त्रोद्योगाला मदत देण्याची भूमिका घेतली असली तरी या क्षेत्रासाठी त्यांनी काही केले नाही, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

उद्योजकांचा पुढाकार

टोप परिसरातील उद्योजकांचे प्रतिनिधी अनिल नानिवडेकर म्हणाले, ‘‘आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या जागेत आयटी, लॉजिस्टिक पार्क, निवासी संकुल सहज उभारता येणे शक्य आहे. शिवाय, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, कौशल्य विद्यापीठ यासह आवश्यक घटकांसाठीही जागा देता येणे शक्य आहे. याकरिता उद्योग खात्याकडून गतीने सकारात्मक प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. कोल्हापुरात उद्योग सुरू करायचा असेल तर बाहेरून येणाऱ्या उद्योजकांसाठी परवानग्यांसह पायाभूत सुविधा देणे आवश्यक आहे. ’’

उद्योजक अभय देशपांडे यांच्या मते पुणे येथील ‘मगरपट्टा’ धर्तीवर आयटी, लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा उद्योजकांचा प्रस्ताव आहे. कोल्हापूर शहरात आयटी पार्क उभारण्याचे प्रयत्न स्वतंत्रपणे सुरू आहेत. यातील काही उद्योजकांना आयटी पार्कमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र वाद न घालता सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्कची नव्याने चर्चा झडत असली तरी अद्याप येथील उद्योग विभागाकडे अधिकृत माहिती उपलब्ध नाही. ‘कोल्हापूरमध्ये उद्योग अधिकाधिक सुरू व्हावेत असा शासनाचा प्रयत्न आहे. तथापि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील उपलब्ध नाही. अधिकृत कागदपत्रे अद्याप उद्योग विभागाकडे उपलब्ध झालेली नाहीत. ती मिळाल्यानंतर तपशील दिला जाईल,’ असे सरव्यवस्थापक सतीश शेळके यांनी सांगितले.

आयटी पार्क आणि गतिरोधक

मुळात आयटी पार्कसाठी इतक्या मोठय़ा प्रमाणात जागेची गरज आहे का, इतक्या मोठय़ा प्रमाणात उद्योजक येथे येणार आहेत का, त्यासाठी अनुकूल पायाभूत सुविधांची उपलब्धता आहे का, या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे उद्योग विभागाकडेही नसताना मंत्र्यांनी मोघमपणे घोषणा केली आहे. उद्योजकांचा एक समूह आहे. मुंबई-पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गलगत टोप, कासारवाडी परिसरातील सुमारे पंचवीस उद्योजकांकडे १२५ एकर जागा उपलब्ध आहे. ती त्यांनी ‘टाऊनशिप’ उभारणीसाठी दहा वर्षांपूर्वी खरेदी केली होती. हा प्रयत्न मागे पडल्यावर आता त्यांनी उद्योग सुरू करण्याबाबत विमानतळावर उद्योगमंत्री देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यातून साधारणता आयटी पार्कसाठी २५ एकर, लॉजिस्टिक पार्क, निवासी संकुल यासाठी आवश्यक जागा आणि उर्वरित जागा अन्य उद्योगांसाठी देण्याची संकल्पना आहे. या प्रस्तावाला शासनाच्या उद्योग विभागाने मंजुरी देणे गरजेचे आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक असणाऱ्या प्रकल्पांना ७२ तासांत परवानगी देण्याचे सूतोवाच केले होते. त्याचा प्रत्यय कोल्हापुरातील या प्रस्तावित उद्योगाच्या बाबतीत आल्यास गती मिळू शकते. अन्यथा गेली अनेक वर्षे केवळ चर्चा- घोषणांच्या पातळीवर असणारे आयटी, लॉजिस्टिक पार्क कागदावरच राहण्याची भीती आहे.