ऊस हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी न मिळाल्यामुळे खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापुरात आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, आंदोलनासाठी जिल्ह्यातून जमा होत असलेल्या शेतकऱ्यांना महामार्गावर पोलिसांनी अडवल्याने शेतकऱ्यांनी आपली वाहने रस्त्यावरच लावून चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलन शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचेही सांगण्यात येते. शेतकऱ्यांनी महामार्गावर अचानक आंदोलन सुरू केल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. तर सांगली-कोल्हापूर मार्गावरही वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन पुकारले असून कोल्हापुरात संघटनेकडून साखर सहसंचालकांना एकरकमी एफआरपीसाठी निवेदन देणार आहेत.

कोल्हापुरात दीड महिन्यांपूर्वी ऊसाचा हंगाम सुरू झाला आहे. कायद्यानुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस दिल्यापासून १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र, काही कारखान्यांनी अजून ही रक्कम दिलेली नाही. राजू शेट्टी यांनी यापूर्वीच एकरकमी एफआरपीसाठी संबंधित साखर कारखानदार आणि प्रादेषिक साखर सहसंचालकांना निवेदन दिलेले आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज (मंगळवार) आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध भागातून शेतकरी कोल्हापूरकडे येत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.