मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला बुधवारी दरोडेखोरांनी लक्ष्य केले. जेजुरी-राजेवाडी स्टेशनवर मध्यरात्री चोरट्यांनी या ट्रेनमधील प्रवाशांचा लाखोंचा ऐवज लुटून नेला. यात रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि मोबाईल यांसारख्या मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेस बुधवारी रात्री मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली.

ही गाडी पावणे दोनच्या सुमारास जेजुरी-राजेवाडी स्टेशनजवळ पोहोचली. या ठिकाणी पाच ते सहा टोळ्या अगोदरपासूनच थांबल्या होत्या. सिग्नलमध्ये बिघाड करुन त्यांनी एक्स्प्रेस थांबवली. त्यानंतर चहा विक्रेत्यांचा बहाणा करुन टोळ्या एस २ आणि एस १२ क्रमांकाच्या डब्यात शिरल्या. या टोळक्यांनी प्रवाशांजवळील मौल्यवान वस्तू हिसकावून पळ काढला.

या घटनेनंतर प्रवाशांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे पुढील प्रवास त्यांनी जागं राहूनच केला. ट्रेनमध्ये ज्यांच्या वस्तू चोरीला गेल्या त्यांनी गाडीतून उतरल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. यात कोल्हापूरच्या तीन प्रवाशांचा समावेश आहे.