कोल्हापुरात ९ नगरपरिषदांमध्ये निवडणूक

राज्यातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभागरचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्यपदाच्या आरक्षणाची सोडत १ जुल रोजी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हय़ातील पात्र नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागाच्या आरक्षण सोडतीचे कामकाज काटेकोरपणे व्हावे, अशा पालिका  प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रभाग आरक्षण सोडतीचे काम आयोगाच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शक सूचनांनुसार करावे, यामध्ये कसल्याही प्रकारची हयगय होता कामा नये अशी सूचना करण्यात आली आहे.

प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभागरचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्यपदाच्या आरक्षणाच्या सोडतीचे कामकाज पारदर्शी व काटेकोरपणे केले जाणार आहे. जिल्हय़ातील प्रभागाचे आरक्षण सोडतीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकासह सादरीकरण करण्यात आले. जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हय़ातील ९ नगरपरिषदांच्या प्रभाग आरक्षण सोडत १ जुल रोजी दुपारी ३ वाजता संबंधित नगरपालिका क्षेत्रात होणार आहे. नगरपालिकेचे नाव, आरक्षण सोडतीचे ठिकाण याची माहिती पुढीलप्रमाणे- इचलकरंजी- नगरपालिका सभागृह, मलकापूर-नगरपालिका सभागृह, पन्हाळा- नगरपालिका सभागृह, जयसिंगपूर-सिद्धेश्वर यात्री निवास हॉल, गल्ली नंबर ४, मुरगुड- यशवंतराव चव्हाण सभागृह, नगरपरिषद, कागल-शाहूनगर वाचनालय, कुरुंदवाड-जिम्नॅशियम हॉल, तबक उद्यान, गडिहग्लज-नगरपालिका सभागृह आणि वडगाव-महालक्ष्मी मंगल धाम, नगरपरिषदेजवळ येथे होणार आहे. ही सोडत उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.