कोल्हापूर : कौटुंबिक वादातून तीन महिन्यांच्या गरोदर नवविवाहितेचा पतीने खून केला. सारिका विठ्ठल महानूर (वय २१) असे तिचे नाव आहे. वडणगे-निगवे मार्गावरील रूपाली हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी ही घटना घडली. खून करून संशयित पती विठ्ठल बलभीम महानूर (वय २५) याने पलायन केले असून  करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजोपाध्यनगर येथे राहणारे विजय रामचंद्र सुभेदार (वय ५५) यांची मुलगी सारिका ऊ र्फ गुड्डी हिचा विवाह १२ जून २०१९ रोजी उस्मानाबाद जिल्यातील डाळिंबा (ता. उमरगा) येथील नातलग असलेले विठ्ठल बलभीम महानूर याच्याशी झाला होता. हॉटेलमध्ये स्वयंपाकी काम करणाऱ्या विठ्ठलला दारूचे व्यसन असल्याने दोघांमध्ये खटके उडू लागले.

हा विवाह जुळवण्यासाठी हॉटेल रूपालीचे मालक राजू महानूर यांनी मध्यस्थी केली होती. महानूर यांनी दोघांना वडणगेला बोलवून घेतले होते. दोघे हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होते. विठ्ठल हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून राजू यांना मदत करीत होता. सारिका तीन महिन्यांची गरोदर होती. आज सकाळी विठ्ठल व सारिका यांच्यात भांडण झाले. विठ्ठलने सारिकाचा गळा दाबून व तोंडावर ठोसे मारून तिचा खून केला. तिने आत्महत्या केली आहे, असे भासवण्यासाठी छताच्या हुकाला ओढणी बांधून मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दाखवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला ते शक्य झाले नाही, त्यामुळे तो पळून गेला.