आमदार सतेज पाटील यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनीही गोकुळ दूध संघाच्या कारभारावर टिकास्त्र सोडले आहे. गोकुळमधून संचालकांना २ लाखाचे पाकीट मिळते. हे पाकीट घेताना माजी आमदार संजय घाटगे यांची लाज कुठे जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे मुश्रीफ-घाटगे वादाबरोबर गोकुळच्या अर्थकारणाबाबत चच्रेला तोंड फुटले आहे.
जिल्ह्यात नेहमीच राजकीय फोडणी देण्याचे काम सुरू असते. आता या वादात कागलचे आजी-माजी आमदार उतरले आहेत. गोकुळ दूध संस्थेचा मुद्दा उपस्थित करत मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर तोफ डागली आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, की सामान्य मायमाउली मुलांच्या तोंडावर मारून ‘गोकुळ’ दूध घालतात, पण सर्वसामान्यांच्या पशातून संचालकांना दरमहा दोन लाखांचे पाकीट (इतर मलई व लोणी वेगळे) मिळते. असे पाकीट घेताना संजय घाटगेंची लाज कुठे जाते, असा पलटवार आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केला.
मुश्रीफ म्हणाले, कागल मतदारसंघातील सर्वधर्मीय गोरगरीब, सामान्य, श्रमिक, दलितांच्या पािठब्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत सलग चार वेळा संजय घाटगेंना चारीमुंडय़ा चीत केले. पंधरा वष्रे मंत्री व वीस वष्रे आमदार म्हणून आपली कारकीर्द आदर्श झाली, तरीही जनतेने नाकारलेल्या घाटगे यांनी नाहक टीका करू नये.
वर्षभरापूर्वी एकत्र
‘गोकुळ’ची निवडणूक वर्षभरापूर्वी झाली असता मुश्रीफ हे गोकुळचे सर्वेसर्वा माजी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या आघाडीसोबत राहिले होते. तेव्हा मुश्रीफ यांना २ लाखाच्या पाकिटाचा विसर का पडला, असा प्रश्न विचारला जात आहे. पाकिटाचे धनी केवळ संचालक आहेत की गोकुळचे सर्वेसर्वा, हेही त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.