मागणी करणे उचित; मात्र हिंसाचाराचा मार्ग चुकीचा

आर्थिक नव्हे तर सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या वर्गास घटनेने आरक्षण दिलेले आहे. या उपेक्षित जाती-जमातीचे प्रश्न अद्याप रेंगाळलेले आहेत. यामुळे आरक्षणाची गरज प्रथम या वर्गासाठीच आहे. आपल्यापेक्षाही अधिक यातना भोगणारा वर्ग आजही या समाजात राहतो याची जाणीव ठेवावी आणि मागणी करणे उचित आहे मात्र हिंसाचाराचा मार्ग चुकीचा आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मराठा आंदोलनकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेले काही दिवस राज्यभर होत असलेल्या हिंसक आंदोलनाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना पाटील यांनी हे मत व्यक्त केले. पाटील म्हणाले, की मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर सुरू असलेले हिंसक प्रकार अयोग्य आहेत. आरक्षणाचा निर्णय हा काही एका रात्रीत होण्यासारखा नसल्याने हा प्रश्न संयमाने मांडला पाहिजे. सरकारशी ‘लढा’ द्यायचा आहे, ‘लढाई’करायची नाही हे लक्षात घेतले पाहिजे.  आरक्षणाची नेमकी गरज कोणाला या बाबतही विचार व्हायला पाहिजे असे सांगत पाटील म्हणाले, की आपल्यापेक्षाही अधिक यातना भोगणारा वर्ग या समाजात राहतो याची जाणीव असली पाहिजे. इतर घटकांना दिलेले आरक्षण अन्य कोणाच्या डोळ्यात खुपता कामा नये. हे आरक्षण त्यांना त्यांचे सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी दिलेले आहे. मराठा समाजातीलही काही वर्ग हा गरिबीत जगतो आहे. त्यांचेही काही प्रश्न असतील, पण हे प्रश्न शांततेच्या मार्गानेच मांडले गेले पाहिजेत. अन्यथा यातून अराजक माजेल. हिंसक वळण लागले तर त्यातून काही नवे प्रश्न निर्माण होतील. या अशा हिंसेतून पुन्हा मराठा तरुणांचेच नुकसान केले जात आहे. पुढे पुन्हा मग गुन्हे मागे घेण्याची देखील शर्यत लागून श्रेयवाद बळावतो आहे. आरक्षणाचा निर्णय कालबद्धरीत्या व्हावा असा आग्रह धरल्याने अधिक नुकसान होऊ  शकते. तसे ते वेळेत झाले नाही तर मग त्याला प्रत्युत्तर म्हणून आणखी मोडतोड केली जाते. त्यातून मूळ प्रश्न बाजूला पडून आंदोलन भरकटले जात आहे. या साऱ्यातून प्रत्यक्ष गरजूंचे मोठे नुकसानच होत असल्याची खंतही व्यक्त केली.

मराठा समाजाची परिस्थितीही समजून घेतली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये टोलेजंग वाडय़ा-बंगल्यात राहणारा आणि मोडक्या घरात राहणारा असा दुहेरी मराठा वर्ग आहे. उद्या या जातीला आरक्षण मिळाले तर ते या आर्थिकदृष्टय़ा दुबळय़ा मराठय़ांना मिळाले पाहिजे असेही मत पाटील यांनी व्यक्त केले.