देण्या -घेण्याच्या मुद्दय़ावरून आम्ही भाजपाशी जोडले गेलो आहोत. यामुळे भाजपकडून आम्हाला काही देण्यास अद्याप अवधी असावा, असे मत नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले.

पक्षाच्या विस्तार आणि पहिल्या जाहीर सभेसाठी राणे आज कोल्हापुरात आले होते. सभेपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदारकी अथवा मंत्रीपद मिळण्यास भाजपकडून सतत का झुलवत ठेवले जात आहे, या प्रश्नावर राणे यांनी वरील मत व्यक्त केले. राणे म्हणाले, की ‘गिव्ह अँड टेक’ पद्धतीने आमची राजकीय सोयरीक झालेली आहे. यामुळे मला काही देण्यास अद्याप अवधी असावा. पण योग्य वेळी ते मिळेल अशी पुस्ती त्यांनी जोडली.

खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत राणे म्हणाले, की त्यांनी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन स्वाभिमान दाखवला. शिवसेनेने आता पटोले यांच्याकडून स्वाभिमान शिकावा. सरकारला लाथाडू असे म्हणायचे आणि सतत सरकारसमोर नाक घासत रहायचे, अशा टीका राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

सोनिया – राहुलवर टीका नाही

शिवसेना सोडली तरी त्यानंतर मी कधीही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. आता काँग्रेसचा त्याग केला असला तरी सोनिया गांधी – राहुल गांधी यांच्यावर कधीही वैयक्तिक टीका करणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. पण, याचवेळी काँग्रेसच्या धोरणांवर कडाडून टीका करण्यास मागे -पुढे पाहणार नाही असे सांगितले.

नितेशचे नुकसान का करू?

काँग्रेसमध्ये बजबजपुरी माजली आहे तर अशा पक्षात पुत्र नितेश राणे अद्याप कसे, या  प्रश्नावर राणे यांनी पुत्राच्या आमदारकीचा बचाव केला. ते म्हणाले, की त्याची ही पहिली निवडणूक आहे. तो अवघ्या ३३ वर्षांचा आहे. राजीनामा देण्यास सांगून नितेशचे नुकसान मी का करू?. शिवाय तो विधिमंडळातील कामात सरस आहे, त्यामुळे तो काँग्रेस सोडणार नाही.