24 January 2020

News Flash

राष्ट्रीय महामार्गाबरोबरच जनजीवन, अर्थकारणही प्रवाहित

लहान-मोठय़ा वाहनांची  वाहतूक सुरू झाल्याने या मार्गावरील जनजीवन आणि अर्थकारणही प्रवाहित झाले

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पोलिस बंदोबस्तात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.

दयानंद लिपारे

महापुराच्या आपत्तीत ठप्प झालेल्या पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या चाकांना  सोमवारी आठवडाभरानंतर गती मिळाली. लहान-मोठय़ा वाहनांची  वाहतूक सुरू झाल्याने या मार्गावरील जनजीवन आणि अर्थकारणही प्रवाहित झाले. मरगळलेल्या वाहन व्यवसायाला नव्याने उभारी लाभली. कोल्हापूर, बेळगाव, कराड या मार्गावर असणारे हजारो ट्रक, कंटेनर, बस पुराच्या पाण्यातून वाट काढत मुंबई वा बेंगलोरच्या दिशेने रवाना झाली.

पंचगंगा नदीला महापूर आल्याने या नदीवर बांधलेला पूल आणि पुलाच्या सुमारे एक किलोमीटरचा रस्ता पाण्यात बुडाला. आठ फूट पाणी पुलावरून वाहत असल्याने पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय गेल्या मंगळवारी प्रशासनाने घेतला. तेव्हापासून या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या चाकांना सक्तीची विश्रांती घेणे भाग पडले. या काळात कराड, कोल्हापूर, निपाणी, बेळगावपर्यंतच्या सुमारे १५० किमी अंतरात हजारो वाहने जागीच खिळली होती. या महामार्गाला प्रथमच इतकी स्तब्धता पाहावी लागली.

सोमवारी सकाळी आठ वाजता पाण्याची पातळी दोन फुटावर होती. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदींनी महामार्गावर रस्त्याची सकाळी पाहणी केली. त्यानंतर प्रथम अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरू करण्यात आली. ही वाहतूक व्यवस्थित होत असल्याचा अंदाज आल्यावर अन्य वाहनासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी शिरोली सांगली फाटा येथे महामार्गावरील अवजड वाहतूक सकाळी नऊ  वाजता सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. त्यामुळे लहान प्रवासी गाडय़ा सुरू करण्यात आल्या नव्हत्या. मात्र आता दुपारी बारा वाजता सर्व प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. एकाच मार्गावरून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. दुचाकी वाहतूक बंद आहे. पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, पेट्रोल—डिझेल, गॅसचे टँकर, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने प्राधान्याने कोल्हापूर शहरात येत आहेत. पुण्याच्या दिशेने तसेच बेळगावपर्यंत वाहतूक सुरू असून गरज असेल तरच बाहेर पडा. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले आहे. गेल्या सहा दिवसांपासून महामार्ग वाहतुकीला बंद करण्यात आल्याने हजारो वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून पडली होती. त्यांना आता गती मिळाल्याने प्रवाशी, चालक, वाहक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

First Published on August 13, 2019 2:00 am

Web Title: national highway livelihoods economics also flowed abn 97
Next Stories
1 पूरग्रस्तांना दिलासा; पण धोका कायम
2 कोल्हापूर: ईदला बोकडाची कुर्बानी नाही, पुरग्रस्तांना करणार मदत; मुस्लिम समाजाचा निर्णय
3 कोल्हापूर : पूरस्थितीचा गैरफायदा घेत चढ्या भावात वस्तू विकणाऱ्यांवर होणार कारवाई
Just Now!
X