कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी रक्ताचे पाणी करू, अशी शिस्तबद्ध सैनिकांची भाषा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते, आमदार हसन मुश्रीफ बोलू लागले आहेत. मुंबईत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीवरून रंगलेल्या कलगीतुऱ्यानंतर आता ते चक्क तहाची भाषा करू लागल्याने पक्षात नेमके काय शिजत आहे याची चर्चा सुरू झाली आहे.

एका अर्थाने मुश्रीफ यांनी विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचाराची धुरा वाहण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या आधीच परिवर्तनाचा विचार पेरणाऱ्या कोल्हापुरात पक्षीय परिवर्तन होताना दिसत आहे,  मात्र परिवर्तनाचा हा मार्ग कसा कसा पुढे सरकणार आणि त्यामध्ये छुपे, उघड डावपेच कसे रचले जाणार, याचे कुतूहल आहे.

मुश्रिफांचा महाडिकांना दिलासा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून अलीकडे राष्ट्रवादीमध्ये हादरे देणाऱ्या घटना घडत आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीस एकदा नव्हे तर दोनदा मुंबईतील बैठकीत विरोध केला. आमदार मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी विरोधाची मोहीम चालवली. पर्यायी उमेदवार म्हणून मुश्रीफ यांनी आपले नावही रेटले, पण पक्षनेते शरद पवार यांनी ‘धनंजय माझी पसंती राहील’ असे स्पष्ट केले. त्यामुळे मुश्रीफ यांचीच कोंडी झाली. मुंबईतून परतल्यानंतर पक्षनेत्यांच्या इशाऱ्यानुसार त्यांनी ‘पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी हाडाची काडे करूया’ अशी भावनात्मक हाक कार्यकर्त्यांना दिली. मुश्रीफ यांची ३६० अंशात बदललेली भूमिका सर्वानाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहे. महाडिक यांना दिलासा देणारे हे विधान आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मुश्रीफ यांनीच प्रचाराची मोहीम फत्ते करून महाडिक यांची नौका पैलतीरी नेण्यास मोलाची मदत केली होती. आता त्यांचा तो उत्साह पुन्हा दिसणार का की केवळ तोंडदेखले बोलून काटा काढण्याची रणनीती राबवली जाणार,  याविषयी शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

मित्रपक्षांच्या परिवर्तनाचा प्रश्न

राष्ट्रवादीत एकोपा दिसू लागला असताना मित्रपक्षाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहे. धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी वैर विसरून सतेज पाटील यांनी प्रचार केला. नंतर महाडिक यांनी पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रचार केला नाही, असा आरोप केला. तो न रुचल्याने पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधाचे शस्त्र उपसले. मात्र सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल हे भाजपकडून रिंगणात उतरले आणि पाटील यांचा विधानसभेचा मार्ग रोखला. पुढे त्याचे उट्टे विधानपरिषद निवडणुकीत पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पराभूत करून काढले. गेली दोन वर्षे पाटील आणि मुश्रीफ हे शिवसेनेचे संजय मंडलिक यांची बाजू उचलून धरत आहेत. आता मुश्रीफ यांनी मिळतेजुळते घेतले असले तरी सतेज पाटील हे काय करणार, आघाडी धर्माचे पालन करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातून आघाडीच्या ऐक्याला बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याने मित्रपक्षांचे परिवर्तन होणार का, हा प्रश्न उरणार आहे.