शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी महालक्ष्मी व त्र्यंबोली देवीच्या भेटीचा पारंपरिक सोहळा गुरुवारी ललिता पंचमीला परंपरागत पद्धतीने आणि उत्साही वातावरणात पार पडला. स्नेहल विनायक गुरव या कु मारिकेच्या पूजनानंतर कोहळा फोडण्याचा विधी झाला. त्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याने पोलिसांनी लाठीमार केला.

कोल्हापूरच्या पूर्वेस लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबोली देवीची नवरात्रोत्सवात पंचमीला मोठी यात्रा भरते. यावर्षीही या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणावर भाविक आले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास महालक्ष्मी व तुळजाभवानीची पालखी व गुरु महाराज वाडय़ातील पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी बाहेर पडल्या.  दुपारी साडेबारा वाजता तिन्ही पालख्या या टेकडीवर दाखल झाल्या. फुलांनी सजवलेल्या सुवर्णपालखीसोबत मानकरी चोपदार व  करवीर संस्थानचा शाही लवाजमा होता.

शाही घराण्याची उपस्थिती

खासदार संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, छत्रपती युवराज पुत्र शहाजीराजे यांचे उपस्थिती होती. त्र्यंबोली देवीची आरती झाल्यानंतर त्र्यंबोली देवी व अंबाबाई देवीचा नयनरम्य भेटीचा सोहळा झाला. त्यानंतर कु मारिका स्नेहल विनायक गुरवचे पूजन छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर करवीर मंडळाधिकारी व तलाठी यांच्या हस्ते त्रिशूळ मारून कोहळा फोडण्याचा विधी झाला.

तीन तरुण जखमी

कोहळ्याचा तुकडा लाभदायक असतो अशी श्रद्धा असल्याने तो मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.  चेंगराचेंगरीत तीन तरुण जखमी झाले. अतिउत्साही भाविकांना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी भाविकांतून होत आहे. यात्रेसाठी तीन पोलिस निरीक्षक ८० पोलीस, २८ गृहरक्षक दलाचे जवान, व्हाईट आर्मीचे ३५  स्वयंसेवक आदी कार्यरत होते.