करवीर नगरीतील श्री महालक्ष्मी मंदिरात मंगळवारी शारदीय नवरात्रोत्सवास चतन्यमय वातावरणात सुरुवात झाली. आदिशक्तीच्या जागरास सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी ८.३० वाजता तोफेच्या सलामीनंतर जिल्हाधिकारी अमित सनी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यापूर्वी उत्सवमूर्ती गर्भकुटीत आणण्यात आली. ९ वाजता शासकीय अभिषेक करण्यात आला. या पूजाविधीनंतर दुपारी ३.३० वाजता श्री अंबाबाईची विधिवत पूजा बांधण्यात आली. त्यानंतर रात्री अंबाबाईच्या पालखीचे पूजन जिल्हाधिकारी अमित सनी आणि जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
अत्यंत मंगलमय वातावरणात आजपासून नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. अनेक भक्तांनी आजच्या पहिल्या दिवशी श्री अंबामातेचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने भतांसाठी केलेली दर्शन व्यवस्था, विविध संघटना, संस्था, महिला मंडळे यांनी राबविलेली विशेष सेवा व्यवस्था यांनी उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भक्तांना आकर्षून घेतले.
महिला आणि पुरुषांसाठी तसेच मुखदर्शनासाठी केलेल्या विशेष दर्शन रांगांमुळे दुरून आलेल्या भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले. प्रत्येकाच्याच घरात घटस्थापना असूनही देवीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय होती. चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
देवीची पूजा आदिलक्ष्मी रूपात
आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी श्री अंबाबामातेची आदिलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. श्री जगदंबा महालक्ष्मी ही अनादिसिद्ध देवता असून हिच्या तत्त्वातून, सृष्टीच्या तत्त्वधारणेनुसार अनेक देवतांची निर्मिती झाली. यापकी अष्टलक्ष्मी याही देवीसंप्रदायात महत्त्वाच्या आहेत. यातील पहिली देवता श्री आद्यलक्ष्मी ही ब्रह्मांडाच्या उत्पत्ती-स्थिती-लयास कारणभूत असते. तसेच यश व धन लाभासाठी हिची उपासना करतात.