राष्ट्रवादी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या घर, दोन साखर कारखान्यासह सहा ठिकाणी प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सकाळी छापासत्र सुरू ठेवले. प्राप्तिकर विभागाची कारवाई शासकीय शिरस्त्यानुसार सुरू असताना कागल मध्ये दिवसभर राजकीय नाटय़ही भलतेच रंगात आले होते. मुश्रीफ समर्थक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी या कारवाईला राजकीय रंग देत शासन, भाजप आणि महसूलमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाईचा रोख ठेवत टीकास्त्र डागले. याला भाजपच्या प्रमुखांकडूनही प्रतिकार करण्यात येऊ न शासकीय कारवाईला राजकीय जाळ्यात ओढण्याचा आणि त्याचा चंद्रकांतदादांशी संबंध जोडण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या राजकीय नाटय़ावर टीका केली.

गुरुवारी भल्या सकाळी प्राप्तिकर विभागाच्या मोठाल्या पथकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा टाकला. आमदार मुश्रीफ यांच्याशी संबंधित दोन कारखाने, कोल्हापूर, पुणे येथील निवास्थान येथेही ही कारवाई सुरू झाली. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी त्यांच्या नियोजनाप्रमाणे कार्यवाही करीत होते.  दीड-दोन तासांनंतर मात्र या कारवाईच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. त्यातून राजकीय नाटय़ भराला आले.

ही कारवाई सुरू होताच मुश्रीफ यांच्या घराजवळ कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमले. पोलिसांच्या फौज फाटय़ाला ही गर्दी आवरता येईना. मुश्रीफ घराबाहेर येऊ न कार्यकर्त्यांना ‘तुम्ही निघून जा आणि  सरकारी यंत्रणेला सहकार्य करा,’ अशी विनवणी हात जोडून करीत होते. गर्दी काही हटायला तयार नव्हती. वृद्ध निराधार अपंग विधवा परित्यक्त्या अशा पाचशेहून अधिक महिलांनी आक्रोश केला. कागदपत्रे जप्त करत असताना मुश्रीफ यांनी मंदिर देणगीचा पावत्या व रुग्णांच्या पत्रांचा ढीग अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याने हे साहित्य जप्त करताना अधिकारीही अवाक झाले.

याच गर्दीत मुश्रीफ यांनी लोकांच्या कामाच्या २५ पत्रावर सह्य केल्या. दुपारी तीन वाजता कागल नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षपदी आनंद पसारे यांची निवड झाल्यावर त्यांनी पोलिस बंदोबस्तात मुश्रीफ यांची भेट घेऊ न सत्कार केला. जमलेल्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी भय्या माने, प्रवीणसिंह भोसले, प्रकाश गाडेकर, अमित गाताडे आदींसह प्रमुख कार्यकर्ते प्रयत्न करीत होते.

राष्ट्रवादी-भाजपात राजकीय जुगलबंदी

या कारवाईला राजकीय स्वरूप असल्याची टीका राष्ट्रवादीने केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भय्या माने यांनी, भाजपात प्रवेश करण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी अव्हेरल्याने आकसाने ही कारवाई केल्याची टीका केली. पाठोपाठ राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी ही कारवाई म्हणजे मुश्रीफ याना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचे सांगत कारवाईचा निषेध नोंदवला. या घटनेला भाजप, चंद्रकांतदादा यांचा संबंध जोडला जात असल्याने भाजपनेही जोरात प्रत्युत्तर दिले. ‘हताशेपोटी राष्ट्रवादीकडून प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोला लगावून भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी लगावला. भाजप, चंद्रकांतदादांवर तथ्यहीन टीका केली जात आहे. राजकीय कारवाई वाटत असेल, तर त्यांनी पुरावे द्यावे, असे सांगितले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव तसेच कागलमधील राजे विR मसिंह घाटगे बँकेचे अध्यक्ष मारुती पाटील म्हणाले, की प्राप्तिकर हा केंद्र सरकारचा विभाग असून काही ठोस माहितीच्या आधारे कारवाई करीत असतो. यात चंद्रकांतदादांचा कसा संबंध आला. मुश्रीफ यांनी चौकशीला सामोरे जात त्यांना सहकार्य करावे.