मी राष्ट्रवादी पक्षाचाच खासदार असून माझ्या पक्षनिष्ठेबद्दल संशय घेणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांची मते गरसमजातून आणि वेदनादायी असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या राजकारणात सध्या मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. या अंतर्गत मुश्रीफ यांनी नुकतीच महाडिक हे राष्ट्रवादी विरोधी असून ते पक्षात नसल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना महाडिक यांनी वरील मत व्यक्त केले. महाडिक म्हणाले, की आमदार मुश्रीफ यांच्या वक्तव्यामुळे मला कमालीच्या वेदना झाल्या असून, जिल्हा परिषद निवडणुकीत मी राष्ट्रवादी विरोधात कुठेही काम केलेले नाही. आमदार मुश्रीफ यांचा गरसमज झाला असून, भाबडेपणाने त्यांनी विधान केल्याचे म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा मी कसोशीने प्रयत्न करत  आहे. त्यासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन मिळते.

जिल्हा परिषद निवडणुकीत मी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवार उभे करुन, पक्षाची वाढ करण्याचे नियोजन केले होते. मात्र आमदार मुश्रीफ यांनी कॉंग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने, मी या निवडणुकीत अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला, असे नमूद करत महाडिक यांनी प्रचारापासून दूर राहिल्याची कबुली दिली आहे. याचवेळी, माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, अशोक जांभळे, धर्यशील माने, मानसिंग गायकवाड यांच्यासह अनेक निष्ठावंत आणि सक्रिय नेते, कार्यकत्रे राष्ट्रवादीपासून दूर गेले. त्यांच्यावर ही वेळ का आणि कोणी आणली, अशी विचारणा करताना त्यांचा रोख मुश्रीफ यांच्यावर आहे .

मुश्रीफ यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका

कोल्हापूर जिल्ह्य़ातील यापूर्वीच्या नगरपालिका निवडणुकीत तालुका निहाय वेगवेगळी समीकरणे आकारास आली. कागल तालुक्यातील राजकीय समीकरणांबाबत मी कधीही प्रश्न उपस्थित केलेला नाही , असा चिमटा काढत महाडिक यांनी, मुश्रीफ यांनी तेथे शिवसेनेसोबत सत्ताबाजार करून कोणती पक्षनिष्ठा राखली, असा सवाल केला आहे.