21 November 2019

News Flash

कोल्हापूरच्या महापौरपदी माधवी गवंडी

या वेळचे महापौरपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चुरस होती.

महापौर निवडीपूर्वी महापालिकेत आलेल्या माधवी गवंडी यांचे तुतारीच्या निनादात असे स्वागत करण्यात आले. (छाया-राज मकानदार)

कोल्हापूर  : गेला पंधरवडाभर गाजत असलेली कोल्हापूर महानगरपालिकेची महापौर निवड  मंगळवारी सरळपणे पार पडली. ४८ व्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधवी प्रकाश गवंडी यांची निवड झाली.

या वेळचे महापौरपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चुरस होती. गवंडी यांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद महापालिका वर्तुळात उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांनी पत्नी सूरमंजिरी लाटकर यांना संधी डावलल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दोन महिन्यानंतर महपौरपद देण्याचा शब्द देऊ न त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे आजची महापौर निवड केवळ एक उपचार होता.

महापौरपदासाठी गवंडी यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. प्रारंभी पीठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी अर्जाची छाननी करुन अर्ज वैध असल्याचे जाहीर केले.

माघारीच्या वेळेत अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नूतन महापौर गवंडी हया प्रभाग क्र.५० पंचगंगा तालीम या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

प्राथमिक शिक्षण समिती सभापतिपदासाठी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील व श्रावण फडतारे यांचे अर्ज दाखल झाले होते. खाडे-पाटील यांना ३ मते, तर श्रावण फडतारे यांना ५ मते पडली. फडतारे यांची सभापतीपदी निवड झाल्याचे घोषित केले. शिक्षण समिती उपसभापतीपदासाठी नगरसेविका अर्चना पागर व नगरसेवक सचिन पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. पागर यांना ३  मते तर पाटील यांना ५  मते पडली. दोन्ही निवडीवेळी पागर गैरहजर होत्या.

First Published on July 3, 2019 4:08 am

Web Title: ncp madhav gavandi become mayor of kolhapur zws 70
Just Now!
X