कोल्हापूर : इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी  राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोल्हापूर शहर, कागल येथे आंदोलन करण्यात आले.  गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकारने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून घोर फसवणूक केली आहे, अशी टीका या वेळी करण्यात आली.

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ वारंवार होत असून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.याच्या निषेधार्थ आज करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालिंगा येथील पेट्रोल पंपावर वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊ न गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. ‘अब की बार तुम्हीच ठरवा यार’. असा भाजप सरकारला टोला लगावणारा फलक घेऊ न कार्यकर्ते पेट्रोल पंपावर आले. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, महिला अध्यक्षा संगीता खाडे, करवीर तालुका अध्यक्ष शिवाजी देसाई आदी सहभागी झाले होते.

दुचाकी ढकलत मोर्चा

कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एस टी स्थानकापासून पेट्रोल पंपापर्यंत दुचाकी ढकलत नेणारा मोर्चा काढण्यात आला. पंपावरील कर्मचाऱ्यांना भाजपचे पक्षचिन्ह  असलेल्या काळ्या कमळाची प्रतिकृती देऊ न इंधन दरवाढ करणाऱ्या सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध  नोंदवण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक भय्या  माने, उपनगराध्यक्ष प्रवीण काळबेर, शिवानंद माळी  यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.