दयानंद लिपारे

लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेचे गतवेळचे लोकसभेचे उमेदवार शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहप्रमुख संजय मंडलिक यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस वा राष्ट्रवादीतील उमेदवारी देण्याचे प्रयत्न उभय काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून सुरू आहेत. मंडलिक मात्र धनुष्यबाण खाली ठेवण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे खुद्द पवार यांचा कृपाशीर्वाद असल्याने पक्षाची उमेदवारी मिळण्याबाबत निश्चिंत आहेत. त्यातही काही अडचण आली तरी निवडणूक लढवण्याचा इरादा कायम असल्याने पक्ष त्यांना बाजूला जाऊ  देणार का, हा प्रश्न आहे. पक्षाच्या महिला आघाडीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा व माजी खासदार निवेदिता माने यांची नाराजी लक्षात घेऊन पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या गावी जाणार असल्याने तेथे नाराजी दूर होणार का हाही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या दौऱ्यात बेरजेचे राजकारण होताना दिसते. आताही ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत असताना लोकसभा निवडणुकीशी संलग्न घडामोडी होत असून याबाबतीत त्यांची भूमिका कोणती राहणार, याकडे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीला आमदार हसन मुश्रिफ आणि खासदार धनंजय महाडिक या बडय़ा नेत्यांतील गटबाजी सतत चर्चेत राहिली आहे. महाडिक यांना शह देण्यासाठी मुश्रिफ यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या सोबतीने सेनेचे संजय मंडलिक यांना आपल्याकडे वळवून उमेदवारी देण्याच्या हालचाली अगदी वाजत केल्या.

अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुश्रिफ-महाडिक यांच्यातील वाद राष्ट्रवादीच्या मुंबईतील लोकसभा निवडणूक आढावा बैठकीतही उमटला. मुश्रिफ समर्थकांनी महाडिक यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला. त्यावर महिन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेवारीवरून कसलीही चर्चा करायची नाही, असा दम स्थानिक नेत्यांना दिला. त्यामुळे महिनाभरात याविषयावर मुश्रिफ यांच्यासह कोणीही उघडपणे काही बोलले नाही, पण छुप्या हालचाली मात्र सुरूच राहिल्या. खासदार महाडिक यांनी पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, शरद पवार यांचा आपल्यावर विश्वास आहे असे अलीकडे सतत सांगण्यास सुरुवात केली आहे. या वेळी ऐनवेळी काही अडचणी आल्या तरी कोल्हापूर मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार, पक्ष-चिन्ह कोणते हे सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी काहीही झाले तरी लोकसभेच्या आखाडय़ात असणार हे स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करण्याचे टाळले असले तरी काँग्रेसच्या हालचाली वाढल्या आहेत. कोल्हापूर मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता असे नमूद करून आमदार सतेज पाटील यांनी तो पुन्हा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली आहे. खेरीज, काँग्रेस- राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय जागावाटपात काही मतदारसंघाचे निर्णय प्रलंबित असून त्यात कोल्हापूरचा समावेश असल्याने हा मुद्दा पुढे आणला गेला आहे.

अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुश्रिफ-महाडिक यांच्यातील वाद राष्ट्रवादीच्या मुंबईतील लोकसभा निवडणूक आढावा बैठकीतही उमटला. मुश्रिफ समर्थकांनी महाडिक यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला. त्यावर महिन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेवारीवरून कसलीही चर्चा करायची नाही, असा दम स्थानिक नेत्यांना दिला. त्यामुळे महिनाभरात याविषयावर मुश्रिफ यांच्यासह कोणीही उघडपणे काही बोलले नाही, पण छुप्या हालचाली मात्र सुरूच राहिल्या. खासदार महाडिक यांनी पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, शरद पवार यांचा आपल्यावर विश्वास आहे असे अलीकडे सतत सांगण्यास सुरुवात केली आहे. या वेळी ऐनवेळी काही अडचणी आल्या तरी कोल्हापूर मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार, पक्ष-चिन्ह कोणते हे सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी काहीही झाले तरी लोकसभेच्या आखाडय़ात असणार हे स्पष्ट केले आहे.

शेट्टी आणि माने घराण्याची खदखद

माजी खासदार निवेदिता माने पक्षात नाराज आहेत. त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी तर जवळपास बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. राष्ट्रवादी आणि खासदार राजू शेट्टी यांची जवळीक माने घराण्यास मान्य नाही. त्यातून मिळाली तर भाजपकडून धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवतील, अशी एक अटकळ आहे. माने यांच्या रुकडी गावात होणाऱ्या कार्यक्रमा वेळी शरद पवार ही नाराजी दूर करणार का, याची उत्सुकता आहे.