इचलकरंजी अर्भक विक्री प्रकरण

इचलकरंजी येथील डॉ. अरुण पाटील यांच्याकडून अर्भक विकत घेणाऱ्या मुंबई व शिंदेवाडी (चंद्रपूर) येथील दाम्पत्यास इचलकरंजी न्यायालयाने शनिवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर मुंबई येथील दाम्पत्याची चौकशी करण्यास सुरुवात केली.

इचलकरंजी शहरात कुमारी माता व विधवा महिला यांची बेकायदेशीरपणे प्रसूती करून त्यांच्या अर्भकांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकाने  डॉ. अरुण पाटील यांच्या रुग्णालयावर छापा टाकून डॉक्टरला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात डॉ. पाटील याने विधवा महिलेचे अर्भक मुंबई येथील डॉक्टर दाम्पत्याला विकल्याचे निष्पन्न झाले होते, तर जत येथील पिडीत मुलीची प्रसूती करून तिचे अर्भक चंद्रपूर येथील अभियंत्याला दिल्याची कबुली दिली होती. अर्भक विकत घेतलेल्या मुंबई आणि चंद्रपूर येथील दाम्पत्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन इचलकरंजीत आणले. डॉ. पाटील याने आपल्या ‘जनरल मॅटर्निटी अ‍ॅन्ड सर्जकिल हॉस्पिटल’मध्ये १२ मे २०१७ रोजी विधवा महिलेला झालेले अर्भक हे मुंबई येथील डॉ. अमोल अशोक सवाई (वय ३९, रा. नेरुळ) यांना, तर ३ डिसेंबर २०१७ रोजी पिडीत मुलीला झालेले अर्भक हे अनिल दशरथ चहांदे (वय ४२ रा. शिंदेवाडी जि. चंद्रपूर) यांना दिल्याचे तपासात समोर आले होते .

चंद्रपूर येथील अमोल सवाई त्याची पत्नी आरती सवाई यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर मुंबई येथील दाम्पत्य अमोल चहांदे त्याची पत्नी प्रेरणा चहांदे यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.