मुख्यमंत्री यांचे हस्ते उद्घाटन झालेल्या न्यायसंकुलाच्या इमारतीस २४ तास उलटण्यापूर्वीच तेथे उद्वाहिकेत (लिफ्ट) बिघाड होण्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. तिसऱ्या मजल्यावर गेलेली उद्वाहिका तळमजल्यावर येऊन पोहोचली तरी कसलीही हानी झाली नाही. इमारत बांधण्याबाबत अनेक आक्षेप प्रजासत्ताक सामाजिक संघटनेने घेतले होते, त्याचा काहीसा प्रत्यय पहिल्याच दिवशी आला असून इमारतीच्या कोणत्याही भागापासून जीवितहानी झाल्यास कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
न्यायसंकुलाची अत्यंत देखणी इमारत बावडा रोडवर बांधण्यात आली आहे. मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते या इमारतीचे रविवारी उद्घाटन झाले. नव्या इमारतीत पहिल्याच दिवशीचे कामकाज सुरळीत झाले. दुपारी उद्वाहिकेतून काही व्यक्ती व साहित्य वरच्या मजल्यावर जात होते तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट पोहोचली असता तांत्रिक बिघाड झाल्याने ती सर्रकन तळ मजल्यावर येऊन पोहोचली. मात्र जीवित वा वस्तू हानी टळल्याने उपस्थितांनी सुस्कारा सोडला. अध्र्या तासानंतर दुरुस्ती होऊन लिफ्ट पूर्ववत सुरू करण्यात आली.
न्यायसंकुलाच्या इमारतीबाबत पूर्वीपासूनच प्रजासत्ताक सामाजिक संघटनेने अनेक आक्षेप नोंदविले आहेत. याबाबत संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई म्हणाले, इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेण्यापूर्वीच ती आयुक्तांच्या एका आदेशाने वापरात आणली आहे. लिफ्टचा वापर करण्यायोग्य असल्याचा तांत्रिक निर्वाळा मिळालेला नसताना वापर सुरू झाल्याने आजची घटना घडल्याचे दिसते. इमारत सदोष असल्याने जीवित हानी झाल्यास कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.