नांदणीसह पंचगंगा नदीकाठच्या गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी इचलकरंजीतील बंधा-यातील बरगे काढण्याचा निर्णय बुधवारी घेतला खरा, मात्र नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत बरगे काढण्यास विरोध दर्शविला. अखेर आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मध्यस्थीनंतर बरगे काढण्याच्या प्रकाराला पूर्णविराम मिळाला असला तरी यातून नदीचा पूर्व आणि पश्चिम यांच्यातील वाद वाढणार आहे.
इचलकरंजी शहरात उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचगंगा नदीतील पाण्यावर नगरपालिकेची भिस्त असल्याने हे पाणी अडविण्यासाठी जॅकवेलनजीक बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधा-यावर नगरपालिकेने बरगे घातले आहेत. कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने प्रशासनाने पंचगंगा नदीतून पाणी उपसा सुरु केला आहे. तर दुसरीकडे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील गावांना केला जाणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार इचलकरंजी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एम. एम. पाटील यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याशी संपर्क साधून बंधा-यावरील बरगे काढण्याची सूचना केली. काळम्मावाडी व राधानगरी धरणातून १२०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सहा दिवसापासून सुरु आहे. शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांसाठी पाणी मिळण्यासाठी बरगे काढणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
याबाबतची पाणी पुरवठा सभापती दिलीप झोळ नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, नगरसेवक विठ्ठल चोपडे, बंडोपंत मुसळे आदींनी तातडीने पंचगंगा नदीकडे धाव घेत बरगे काढण्यास विरोध दर्शविला.  गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण बरगे काढणार नाही असा इशारा सदस्यांनी दिला. सदस्यांच्या भूमिकेपुढे शाखा अभियंता नरमले व त्यांना तेथून परतावे लागले.
निमंत्रण  पाणीबाणीला
बंधा-याला बरगे घालून पाणी अडविल्यामुळे पूर्वेकडील पंचगंगेचे पात्र मात्र कोरडे पडले आहे. यामुळे पूर्वेकडील शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांना मात्र  घसा कोरडा ठेवत पाण्यासाठी वणवण करत भटकंती करावी लागणार आहे. एकाची सोय होत असली तरी दुस-याच्या तोंडचे पाणी पळून जात आहे. एकाच नदीवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाण्यावरून वाद वाढत जाण्याची चिन्हे आहेत.