16 October 2018

News Flash

नवजात अर्भकांची विक्री

इचलकरंजीत डॉक्टरला अटक

(संग्रहीत छायाचित्र)

इचलकरंजीत डॉक्टरला अटक

कुमारी माता, विधवा महिलांना सांभाळून त्यांच्या बाळंतपणानंतर नवजात  अर्भके लाखमोलाच्या किमतीला विकणाऱ्या इचलकरंजी येथील डॉक्टरला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने बुधवारी त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पाटील यांच्या रुग्णालयावर आज पुन्हा छापा टाकण्यात आला असून, केंद्रीय महिला बाल कल्याण समितीला महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. दरम्यान, पोलिसांनी डॉक्टरची पत्नी व अन्य दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

इचलकरंजी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती डॉ. अरुण पाटील यांचे जवाहरनगर येथे  रुग्णालय आहे. ते रुग्णालयात कुमारी माता, विधवा महिलांचा सांभाळ करत असत. नंतर त्यांचे रुग्णालयात बाळंतपण करून जन्मलेले अर्भक अन्यत्र विकत होते. या बाबत दिल्लीतील केंद्रीय महिला बाल कल्याण समितीकडे छायाचित्रांसह तक्रार दाखल झाली होती. यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष एम. रामचंद्र रेड्डी यांनी दिली.

त्यानुसार समितीचे अध्यक्ष एम. रामचंद्र रेड्डी, सदस्य शिवानंद डंबळ, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी चोरगे, जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष सागर दाते, डॉ. प्रमिला जरग यांच्या पथकाने काल डॉ. पाटील यांच्या रुग्णालयावर धाड टाकली. तेथील सर्व रजिस्टर तपासले असता २०१४ पासून या दवाखान्यात जन्मलेल्या बाळांची नोंद नव्हती. या बाबत डॉक्टर पाटील यांच्याकडे चौकशी केली असता दवाखान्यात जन्मलेली काही मुले मुंबई, छत्तीसगड, मराठवाडय़ात पाठवल्याची कबुलीही दिली असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांचे  म्हणणे आहे.

दरम्यान, बुधवारी डॉ. अरुण पाटील यांना न्यायालयासमोर उभे केले. सरकारी वकील आणि पाटील यांचे वकील यांच्यात सुमारे सव्वा तास युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने पाटील यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

अनाथ बालके ताब्यात

दरम्यान, या पथकाने कोरोची (ता. हातकणंगले) येथील  संतोषीमाता बाल अनाथाश्रम-उन्नती मंडळावर छापा टाकला. या वेळी परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्य सुरू असल्याचे  सांगत कारवाईला विरोध केला. मात्र पोलीस बंदोबस्तात १२ ते १४ वष्रे वयोगटातील १४ मुलांना पथकाने ताब्यात घेतले. यापूर्वीही दोन वेळा या अनाथालयावर धाड टाकून १६ मुलांना ताब्यात घेतले असल्याचे सांगून प्रियदर्शनी चोरगे यांनी अनाथालय आणि नर्सिंग होममधून अवैधरीत्या मुले विकली जात असल्याचे स्पष्ट केले.

First Published on February 8, 2018 12:50 am

Web Title: newborn baby sale by doctor in kolhapur