सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गणवेश नसल्याचे कारण देत शिस्तीचा बडगा उचलत १५ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले गेले नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शासकीय तंत्रनिकेतनने नियमांचा अतिरेक केल्यामुळेच विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागल्याची तक्रार पालकवर्गाने केली. तर गणवेश अनिवार्य असल्यामुळे त्याचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही, असा दावा शासकीय तंत्रनिकेतनने केला आहे.
शहरात सम्राट चौकातील एसईएस तंत्रनिकेतनची विद्याíथनी भाग्यश्री सोमशंकर पाटील (मूळ रा. कोथळे, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हिला गणवेश नसल्याने परीक्षेला बसू न दिल्याने मनस्ताप झाला आणि भोवळ येऊन ती कोसळली. भाग्यश्री पाटील ही परीक्षा देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आली असता तिच्यासह १५ विद्यार्थ्यांकडे गणवेश नव्हता. गणवेश असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही, असा दंडक शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्या स्वाती देशपांडे यांनी घातला. विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसू देण्याची विनवणी केली. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे, अशी आगाऊ सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले, असे स्पष्टीकरण एसईएस तंत्रनिकेतनचे प्राचार्य दत्तप्रसाद कुलकर्णी यांनी दिले. मात्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अधिकृत परीक्षा प्रवेशपत्र असते. प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांचे अधिकृत छायाचित्र असते. त्याची तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाते परंतु शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अधिकृत परीक्षा प्रवेशपत्रापेक्षा गणवेश महत्त्वाचा मानला गेला.
तथापि, पुण्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे सचिव डॉ. पी. आर. मानकर यांनी परीक्षेला गणवेश घालावाच, असा नियम नाही. परंतु समन्वय समितीच्या बठकीत गणवेशाचा मुद्दा चच्रेत आला. मात्र वेळीच समन्वय झाला असता तर विद्यार्थ्यांना नाहक फटका बसला नसता, असे स्पष्ट केले.