करवीरनगरीतील मंडळांची डॉल्बीबाबत तऱ्हा

आधी डॉल्बीचा दणदणाट करायचा आणि नंतर डॉल्बी लावणाऱ्या मंडळांनी ध्वनी मर्यादेचा भंग केल्याबद्दल नागरिकांकडे दिलगिरी व्यक्त करायची असा प्रकार करवीरनगरीत लोकप्रतिनिधींच्या सहमतीने होत आहे. तशी सूचना शिवसेनेचे डॉल्बी समर्थक आमदार राजेश क्षीरसागर यांनी विश्रामगृहामध्ये झालेल्या गणेश मंडळांच्या बठकीत व्यक्त केली .

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये डॉल्बी न वाजवण्याची भूमिका अनेक मंडळांनी घेत पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला.  डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना अनुसरून डॉल्बी मंडळांनीही लावला नाही. पण शहरातील १६ मंडळांनी मात्र डॉल्बीच्या दणदणाटामध्ये गणपतीचे विसर्जन केले. ध्वनी मर्यादेचा भंग केल्याप्रकरणी या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची बठक आमदार क्षीरसागर यांनी घेतली. पोलिसांनीही कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी डॉल्बी वाजवलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

यावेळी फिरंगाई तालमीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले म्हणाले,  डॉल्बी लावण्याची चूक आमच्याकडून घडल्याने दिलगिरी व्यक्त करतो.

पण पर्यावरण कायद्याच्या कलमाखाली कार्यकर्त्यांवर नाहक खटले चालवू नयेत. यामुळे तरुण मुलांचे करीअर उद्ध्वस्त होणार असल्याने पालकमंत्र्यांनी विचार करावा. कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले तर सर्व कार्यकर्त्यांचा न्यायालयीन कामकाजासाठी येणारा खर्च करू.’

आमदार क्षीरसागर म्हणाले,  जिह्यातील केवळ १६ मंडळांनीच ध्वनी मर्यादेचा भंग केला. मंडळांना अद्दल घडवा, हे पालकमंत्री उद्वेगाने बोलले असतील. या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई न करण्याबाबत ते सकारात्मक आहेत. गृह राज्यमंत्री दिलीप केसरकर शिवसेनेचे असून त्यांच्याशी चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिलगिरीचे पत्र द्यावे. आपण दिलगिरी पोलिसांकडे नाही तर नागरिकांकडे व्यक्त करत आहोत.  पोलिसांनीही कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करू नये.’

पोलिसांचे डेसिबल मोजणार कोण

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना मांडणाऱ्या पोलिसांनी विसर्जन मिरवणूक झाल्यावर जल्लोषात नृत्य केले.  ते  हलगीच्या नव्हे तर डॉल्बीच्या तालावर नाचले. याचे डेसिबल कोणी का मोजले नाही, असा संतप्त सवाल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांने केला.